Thursday , January 17 2019
Breaking News

उत्तर प्रदेशात अखेर सपा – बसपा एकत्र; भाजपाला दिला इशारा

लखनऊ : आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपाविरोधात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आले आहेत. आज लखनऊमध्ये  सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची झोप उडवणारी ही पत्रकार परिषद ठरेल, असे सांगत मायावती यांनी बसपा- सपा आघाडीची घोषणा केली. भाजपाच्या हुकमी कारभाराविरोधात आम्ही एकत्र आले असून जनतेला आमच्याकडून आशा आहेत, असे त्यांनी सांगितले आहे.

लखनऊ  येथे अखिलेश यादव आणि मायावती यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस व भाजपावर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या काळात देशात घोषित आणीबाणी होती, तर आता देशात अघोषित आणीबाणी आहे, अशी टीका त्यांनी केली. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसकडे अनेक वर्षे सत्ता होती ,काँग्रेसच्या काळातही भ्रष्टाचार, गरिबी वाढली, काँग्रेस- भाजपाची अवस्था एकसारखीच आहे, दोन्ही सरकारच्या काळात घोटाळे झाले आहेत असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या काळात त्यांना बोफोर्स घोटाळ्यामुळे सत्ता गमवावी लागली होती, तर आता भाजपाला राफेल घोटाळ्यामुळे सत्ता गमवावी लागेल, असा दावाही त्यांनी केला. या महाआघाडीसाठी मी मायावतींचा आभारी आहे, असे अखिलेश यादव यांनी सांगितले.

जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगितला

समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आले तरी लोकसभेसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मायावती यांनी पत्रकार परिषदेत जागावाटपाचा फॉर्म्युलाही सांगितला. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण ८० जागा असून बसपा ३८ आणि सपा ३८ जागांवर निवडणूक लढवणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी रायबरेली आणि अमेठी या दोन मतदारसंघात काँग्रेसविरोधात आम्ही उमेदवार देणार नाही, असेही मायावतींनी सांगितले. तर उर्वरित जागा महाआघाडीत सामील होणाऱ्या अन्य पक्षांसाठी सोडल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. अन्य छोट्या पक्षांशी चर्चा सुरु असल्याचे सांगत महाआघाडीत आणखी कोणते पक्ष येणार याचे उत्तर देणे मात्र त्यांनी टाळले.

About Mahadev Gore

हे देखील वाचा

अंकितानं दिली रिलेशनशिपविषयीची कबुली!

मुंबई : ‘पवित्रा रिश्ता’ या शो मधून फेमस झालेली अर्चना म्हणजेच अंकिता लोखंडेने प्रेक्षकांच्या मनावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!