Wednesday , November 21 2018
Breaking News

युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडणुकीत सत्यजित तांबे विजयी

अहमदनगर-महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सत्यजित तांबे हे सर्वाधिक मते घेऊन प्रदेशाध्यक्ष झाले आहेत तर आमदार अमित झनक हे दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन उपाध्यक्ष तर त्यासोबतच कुणाल राऊत हे देखील उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. साठ युवकांची प्रदेश कार्यकारणी देखील या निवडणुकीच्या माध्यमातून तयार झाली आहे.

नागपूर येथे आज युवक काँग्रेसच्या निवडीचा निकाल होता. सत्यजीत तांबे यांना 70 हजार 189 मते मिळाल्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सत्यजीत विजयी झाले. आमदार झनक 32 हजार 999 मते तर कुणाल राऊत 7 हजार 744 मते मिळवून उपाध्यक्ष झाले. सत्यजीत तांबे हे 37 हजार 190 मताधिक्याने निवडून आले.

सत्यजित तांबे यांनी दोन वेळा अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 2014 ला काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. गेल्या पंधरा वर्षांपासून एनएसयुआय व युवक काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी संघटनबांधणी त्यांनी केली आहे. अभ्यासू, आक्रमक आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेला काँग्रेसमधील युवानेता अशी त्यांची ओळख आहे.

माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे ते भाचे आहेत. गल्ली ते दिल्ली काँग्रेसमधील नेते व कार्यकर्त्यांसोबत त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विश्वासातील युवानेता अशी देखील त्यांची ओळख असून या अगोदर दोन वेळा त्यांनी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पद भूषविले आहे. नागरी विकास, अंतरराष्ट्रीय राजकारण आणि युवक सशक्तीकरण या विषयावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. सत्यजित तांबे यांच्या रूपाने सर्वांना सोबत घेऊन विद्यमान भाजपा सरकार विरोधात संघर्ष करू शकणारा आश्वासक चेहरा युवक काँग्रेसला मिळाल्याचे बोलले जाते आहे.

About प्रदीप चव्हाण

हे देखील वाचा

राजे रघुनाथराव देशमुख वाचनालयात स्व.इंदिरा गांधी व संत नामदेव महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

रावेर- कार्तिक एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशीला संत नामदेवांची जयंती व भारताच्या पूर्व पंतप्रधान स्व. इंदिराजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!