अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला अटक !

0

सेनेगल : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पश्चिम ऑफ्रिकेच्या सेनेगल येथे अटक करण्यात आली. भारतातील रॉ अधिकारी आणि कर्नाटक पोलिस सेनेगलमध्ये दाखल आहेत. दरम्यान, पुजारीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सध्या पूर्ण केली जात असून त्याला घेऊन पोलीस भारतात परततील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुजारीला कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. यामुळे मुंबई पोलिसांना रवी पुजारीची कोठडी मिळविण्यासाठी काही काळ वाट पहावी लागणार आहे.

रवी पुजारीला २१ जानेवारी २०१९ रोजी सेनेगलची राजधानी डकारमधील एका हेअर कटिंग सलूनधून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर जून २०१९ मध्ये तो फरार झाला होता. त्यानंतर त्याचा कोणताच मागमूस लागत नव्हता. आता सेनेगलमधूनच त्याच्या मुसक्या आवळण्यात यंत्रणांना यश आलं आहे.

पुजारीवर कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी व अन्य अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कर्नाटकात बेंगळुरूमध्ये ३९, मंगळूरमध्ये ३६, उडुपीमध्ये ११ तर म्हैसूर, हुबळी-धारवाड, कोलार आणि शिवमोगामध्ये प्रत्येकी एक गुन्हा पुजारीविरुद्ध दाखल आहे. महाराष्ट्र मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये पुजारीविरुद्ध ४९ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यातील २६ गुन्हे मकोकाखाली दाखल झालेले आहेत. गुजरातमध्ये त्याच्याविरुद्ध खंडणी प्रकरणी ७५ गुन्ह्यांची नोंद आहे. गेल्या दोन दशकांपासून पुजारी भारताला गुंगारा देत आहे.