अंत्योदय लाभार्थींची साखर गायब

0

जळगाव: आर्थीक दृष्ट्या दुर्बल घटकांना शासनाकडून स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्यासह साखरेचा पुरवठा केला जातो. अंत्योदय कार्डधारकांना गहू, तांदूळ, डाळींसह साखर देखील वाटप केली जाते. मात्र अंत्योदयच्या लाभार्थ्यांना केवळ धान्यच मिळत असुन साखर मात्र गायब केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा पुरवठा विभागाच्या तपासणीत उघड झाला आहे. ज्या ठिकाणी अंत्योदयच्या लाभार्थ्यांना साखर मिळालेली नाही त्याठिकाणच्या दुकानांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी दिली.
जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडून जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांची तपासणी केली जात आहे. यामध्ये कार्डधारकांचा बायोमॅट्रीक पद्धतीने थम घेवून त्यानंतरच कार्डधारकांना धान्याचे वाटप केले जाते. संपूर्ण जिल्हाभरात ही प्रणाली कार्यन्वयीत करण्यात आली आहे. अंत्योदय कार्डधारकांना गहू, तांदूळ, डाळ यासह शासनाकडून साखरेचा देखील पुरवठा केला जात असतो. परंतु रेशनदुकानदारांकडून कार्डधारकांना केवळ धान्याच पुवरठा केला जात असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी केलेल्या पाहणीत दिसून आले.

दुकानदारांची चलाखी

रावेर तालुक्यातील अनेक रेशन दुकानदारांकडून अंत्योदय कार्डधारकांचा महिन्याच्या पहिल्या आठवड्याला अंगठा घेतला जातो. त्यानंतर दुसर्‍या आवठवड्यात जो कार्डधारक धान्य घेण्यासाठी आला त्यालाच धान्याचे वाटप केले जाते. जे आले नाही त्यांचे धान्य आणि साखर गायब होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.


जिल्ह्यात 22 ठिकाणच्या दुकानांची तपासणी

जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी अडावद- 3, चोपडा-6, वटार- 1, रावेर-5, पारोळा-7 अशा एकूण 22 ठिकाणी रेशन दुकानांची तपासणी केली. यामध्ये बहुतांश ठिकाणावर अंत्योदय कार्डधारकांना साखरेचा पुरवठाच केला जात नसल्याचे त्यांच्या पाहणीत समोर आले. तसेच वटार येथे गेल्या अनेक महिन्यांपासून धान्य वाटपच नसल्याने त्याठिकाणावरील परवाना रद्द करणार असल्याचे पुरवठा अधिकारी सुर्यवंशी यांनी सांगितले.

धान्याचे वाटप न करणार्‍यांचे निलंबन

शासनाकडून अंत्योदय कार्डधारकांना धान्याचे वाटप करण्यासाठी रेशनदुकानदारांच्या मागणीनुसार पुरेसा पुरवठा केला जात असतो. परंतू रेशनदुकानदारांकडून कार्डधारकांना धान्याचे वितरण अंत्यत अल्प प्रमाणात केले जातेे. ज्या रेशनदुकानदाराकडून कार्डधारकांना धान्य वाटपात कसूर केला जात आहे. अशा रेशनदुकानदारांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबीत केला जाणार असल्याची माहिती पुरवठा अधिकारी यांनी दिली.

ग्रामसेवकांच्या उपस्थितीत धान्य वाटपाचे नियोजन

रेशन दुकानदारांच्या धान्य वाटपाबाबत असलेल्या मनमानी कारभाराला चाप बसविण्यासाठी पुढील काही महिन्यात ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, सप्लाय इंन्सपेक्टर यांचा अहवाल आल्यानंतरच रेशन दुकानदारांना धान्याचे वाटप करण्याबाबत त्यांचे नियोजन सुरु असल्याचेही जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील
सुर्यवंशी यांनी सांगितले.