अखेर त्या महिलेचा मृत्यू !

1

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील जळीत महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. लासलगाव बस स्थानकात पेट्रोल अंगावर पडून गंभीर भाजलेल्या गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेली महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. भायखळा येथील मसिहा रुग्णालयात शुक्रवारी रात्री १२.३० वाजता पीडित महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. मुंबईतील जे.जे.रुग्णालयात मृत पीडित महिलेचे शवविच्छेदन केले जाणार असून त्यानंतर मृतदेह लासलगाव येथे तिच्या राहत्या घरी पाठवण्यात येणार आहे.

१५ फेब्रुवारी रोजी लासलगाव बस स्थानकात आपसातील वादातून महिलेच्या अंगावर पेट्रोल पडून तिच्या कपड्यांनी पेट घेतला होता. यात सदर महिला ६७ टक्के भाजली होती. नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात महिलेला दाखल करण्यात आले होते. दरम्यान, गेल्या आठवड्यात शनिवारी मध्यरात्री पुढील उपचारासाठी पोलीस बंदोबस्तात मुंबईला हलवण्यात आले होते. पोलिसांनी संबंधित महिलेचा कथीत पती, त्याचे दोन साथीदार, पेट्रोल पंपाचा व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांवर ज्वलनशील पदार्थाचा हयगयीने वापर केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

लासलगांव जळीत प्रकरणातील महिलेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली असून या महिलेचे दुर्दैवी निधन झाले. ही घटना मनाला चटका लावणारी आहे. या प्रकरणातील दोषींना कठोर शासन व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.