अत्याचार करणार्‍याला फाशी देण्याची मागणीसाठी फैजपूरात मूक मोर्चा

0

यावलसह रावेर तालुक्यातील कुंभार बांधवांचे प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन

फैजपूर- कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यातील मुलूर येथील अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करणार्‍या समाजकंटकांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी फैजपूर प्रांत कार्यालयावर सोमवारी निषेध मूक मोर्चा काढण्यात आला. कर्नाटक राज्यातील मुलूर जिल्हा कोलार येथील अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली या घटनेचा निषेध म्हणून आज फैजपूर शहरासह यावल, रावेर तालुक्यातील कुंभार समाज बांधवांनी फैजपूर प्रांत कार्यालयावर सोमवारी सकाळी 11 वाजता मूक मोर्चा काढला. प्रांताधिकरी डॉ.अजित थोरबोले यांना निवेदन देण्यात आले.

यांचा मोर्चात सहभाग
या घटनेतील दोषी नराधमांना शासनाने व न्यायव्यवस्थेने कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
पीडित विद्यार्थिनीस न्याय मिळवून तिच्या कुटुंबास न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. हा मूक मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पण अर्पण करून सुभाष चौक, अंकलेश्‍वर-बर्‍हाणपूर महामार्गावरील छत्री चौक मार्गे प्रांत कार्यालय असा काढण्यात आला.. या मूक मोर्चात भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी, फैजपूरचे माजी नगरसेवक मनोज कापडे, रावेर तालुका कुंभार समाजाध्यक्ष घनश्याम हरणकर, माजी उपनगराध्यक्ष बापू कापडे, शिवसेना नगरसेवक अमोल निंबाळे, आरपीआय (गवई गट) अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष ईश्वर इंगळे, एकलव्य आदिवासी भिल्ल समाज यावल तालुकाध्यक्ष भिका वाघूळदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अन्वर खाटीक, बाळा भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विकास विभाग शहराध्यक्ष अशोक भालेराव, सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान, हाडवैध रघुनाथ कुंभार, भारिप बहुजन शहराध्यक्ष अमर मेढे, गोकुळ कुंभार यांच्यासह संतोष कापडे, राजू कुंभार, अनुप ठाकरे, गोटू न्हावकर, प्रल्हाद कापडे, आप्पा चौधरी, राजू कठोके यांच्यासह बहुजन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहर संघटक शिवसेना राकेश करोशिया यांनी या मोर्चाला पाठींबा दिला.