अनंतकुमार हेगडेंच्या वक्तव्याचे लोकसभेत पडसाद; विरोधकांचा गदारोळ !

0

नवी दिल्ली: भाजप नेते खासदार अनंतकुमार हेगडे यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वादग्रस्त वक्तव्य केले होते. दरम्यान याचे पडसाद लोकसभेत उमटले आहे. विरोधकांनी हेगडे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गदारोळ केला. कॉंग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी भाजपवर निशाणा साधला. हेगडे यांना भाजप पाठीशी घालत असून भाजप नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान केला जात असल्याचे आरोप करत विरोधकांनी लोकसभेत गदारोळ केला.

अधीर रंजन चौधरी यांनी भाजपवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भाजपवाले रावणाची औलाद आहे असे विधान चौधरी यांनी केले. या वक्तव्यावर भाजप खासदारांनी आक्षेप घेत सभागृहात गदारोळ केला.

हेगडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून भाजपकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कर्नाटक भाजपचे प्रमुख नलिन कुमार कटील यांनी ही माहिती दिली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हेगडे यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतल्याचे ते म्हणाले.