अब्दुल सत्तार अपक्ष लढण्यावर ठाम ; कॉंग्रेसकडून उमेदवार बदलण्याची शक्यता

0

औरंगाबाद-मराठवाड्यातील कॉंग्रेसचे महत्त्वाचे नेते माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार हे औरंगाबादमधून लोकसभेसाठी इच्छुक होते मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज आहे. सत्तार यांनी पक्षाचा राजीनामा देऊन दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र यावर त्यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपमध्ये जाणार नसल्याचे सांगितले आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी औरंगाबाद लोकसभेचे तिकीट बदलून देण्याचे आश्वासन दिले आहे असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे, असे असले तरी ते लोकसभेसाठी ठाम असून शुक्रवारी २९ मार्च रोजी कार्यकर्ता मेळाव्यात भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे.

कॉंग्रेसकडून औरंगाबाद लोकसभेसाठी सुभाष झांबड यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी केली. आपण औरंगाबादमधून अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर करताच पक्षातील अंतर्गत कलह समोर आला. यातच शनिवारी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी आज पत्रकार परिषदेत भूमिका माडंली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर अब्दुल सत्तार म्हणाले, सिल्लोडसाठी भरीव निधी दिल्याबद्दल मी त्यांचे भेटून आभार मानले आहेत. मी भाजपमध्ये जाणार नसून अशोक चव्हाणच माझे नेते आहेत असेही ते म्हणाले.

जालना लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांनी काँग्रेसमध्ये यावे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवावी यासाठी सत्तार यांनी प्रयत्न केले होते. मुख्यमंत्र्यांनी खोतकर आणि दानवेंमध्ये समन्वय घडवून आणले. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरले.