अभ्यासाकडे केंद्रीत होवून शाळेसह देशाचे नाव उज्ज्वल करा

0

ज्योती आमगे ; भुसावळातील बियाणी मिलिटरी स्कूलध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

भुसावळ- वय, उंची, रूप या बाबींकडे लक्ष देवू नका, जीवनात काहीतरी बनायचे असेल तर ध्येय निश्‍चित करून त्यासाठी कठोर परीश्रम घेवून अभ्यास करा, अभ्यासातून तुमचे भविष्य उज्ज्वल होईल व त्यामुळे तुमच्या पालकांसह शाळेचे, गावाचे व परीणामी देशाचेही नाव उज्वल होेईल, असा विश्‍वास गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात कमी उंचीची व्यक्ती अशी नोंद झालेल्या ज्योती आमगे (नागपूर) यांनी येथे व्यक्त केला. आमगे या खाजगी कामानिमित्त शनिवारी भुसावळात आल्या होत्या. याप्रसंगी त्यांनी जामनेर रोडवरील बियाणी मिलिटरी स्कूलला सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शिक्षणाने बदलेल परीस्थिती
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ज्योती आमले यांनी आपले स्वतःचे उदाहरण दिले. त्या म्हणाल्या की, आज जगातील सर्वात कमी उंचीची मुलगी म्हणून माझ्याकडे पाहिले जाते मात्र केवळ त्याचा न्यूनगंड मी कधीही मनात बाळगला नाही. अभ्यासात लक्ष देवून आज मी एम.ए.इंग्लिशपर्यंत शिक्षण घेतल्याचे त्यांनी सांगितले. संकटे कितीही येवू द्या, तुम्ही तुमचे ध्येय निश्‍चित करून अभ्यासावर फोकस करा, यश तुम्हाला हमखास मिळेल, असा आत्मविश्‍वासही तिने व्यक्त केला. सैनिकी शाळेबद्दल आमगेही प्रसंगी गौरवोद्गार काढत संस्थाध्यक्ष, प्राचार्यांचे कौतुक करून आभारही मानले.

यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, संस्थेचे अध्यक्ष मनोज बियाणी, सेक्रेटरी संगीता बियाणी, रजनी सावकारे, राजू पारीख, किरण पारीख, बियाणी मिलिटरी स्कूलचे प्राचार्य डी.एम.पाटील, सोफीया फ्रान्सिस, प्रेमसिंग बोदर आदींची उपस्थिती होती.

भुसावळशी आमगेंना लळा
शहरातील झेडटीआरआय भागातील आप्तेष्टांकडे लग्न असल्याने गेल्या दोन दिवसांपासून ज्योती आमगे या भुसावळात मुक्कामी होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे आई, वडील, बहिण, मेहुणे यांच्यासह नातेवाईकांनीही बियाणी स्कूलला भेट देवून समाधान व्यक्त केले.