अमळनेरच्या पोलिस कोठडीतील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू

0

पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू : कुटुंबीयांचा आरोप, इन कॅमेरा शवविच्छेदन

अमळनेर- अमळनेर पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केलेल्या नरेंद्र पाटील याचा गुरुवारी मध्यरात्री धुळ्यातील खाइगी रुग्णालयात मृत्यू झाला. डायलिसिसचा रुग्ण असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे पाटील यांच्या उपचाराला विलंब झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला अमळनेर पोलिस ठाण्याचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला. नरेंद्र पाटीलच्या मृतदेहाचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यात आले. तसेच तपास सीआयडीकडे देण्यात आला.

अमळनेर येथील रहिवासी असलेले नरेंद्र केशवराव पाटील (वय 50) याला ट्रॅक्टर ट्रॉलीवर बनावट क्रमांक टाकल्या प्रकरणी अटक केली होती. पोलीस कोठडीत असताना धुळे येथील खाजगी रुग्णालयात उपचारादारम्यान त्याचा गुरुवारी रात्री 1 वाजता मृत्यू झाला. त्यानंतर सकाळपासून धुळे व अमळनेर येथील त्यांचे नातलग जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहाजवळ जमा झाले होते. पोलिसांच्या ताब्यात असताना पाटील यांचा मृत्यू झाला असल्यामुळे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात येईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली होती. शिवाय दुपारी तहसीलदार अमोल मोरे यांनी शवविच्छेदनगृहाला भेट दिली.

तपास सीआयडीकडे
नरेंद्र पाटील याचा मृत्यू पोलिस कोठडीत असताना झाल्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे दिला. जळगाव सीआयडी रजेवर असल्याने नाशिक येथील सीआयडीचे डीवायएसपी ए.व्ही. शिंदे यांच्याकडे तपास दिला. त्यानंतर पोलीस स्टेशन डायरी, लॉक अप रजिस्टर, मानवाधिकार रजिस्टर गार्ड रजिस्टर अटक रजिस्टर व्हिजिट रजिस्टर ताब्यात घेऊन सील करण्यात आले. . सीआयडीचे अधिकारी अमळनेर येथे तळ ठोकून आहेत. या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी केली जाईल असे आश्वासन देण्यात आले.