अमेरिकेच्या व्हाईट हाउसच्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण

0

वॉशिंग्टनः जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी अनेक देशांकडून कडक पावले उचलण्यात येत आहे. अमेरिकेत आणीबाणी जाहीर रण्यात आली आहे. अमेरिकेत १६ हजार पेक्षा अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली असून, २२५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे कोरोना व्हायरस हा सामान्यांपर्यंत मर्यादित न राहता आता अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात जाऊन पोहोचला आहे. व्हाइट हाऊसमधला एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे तपासणीत समोर आले आहे.

या वृत्तानंतर व्हाइट हाऊसमध्ये खळबळ उडाली आहे. आता तो अधिकारी व्हाइट हाऊसमधल्या कोणकोणत्या व्यक्तींच्या संपर्कात आला होता, त्याचा शोध घेतला जात आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स गेल्या काही दिवसांपासून या व्यक्तीच्या संपर्कात नाहीत. काल संध्याकाळी उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांचा कार्यालयातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती उपराष्ट्राध्यक्षांचे प्रेस सचिव कॅटी मिलर यांनी दिली आहे. आता आरोग्य विभागाच्या नियमावलीनुसार ही व्यक्ती कोणाकोणाच्या संपर्कात आलेली होती, याची माहिती घेतली जात आहे.

व्हाइट हाऊस परिसरात प्रवेश करण्यासाठी कडक नियमावली जारी करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या डॉक्टरांची टीम आणि सीक्रेट सर्व्हिस एजंट हरेक व्यक्तीच्या तापमानाची तपासणी करूनच त्यांना व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश देत आहेत. व्हाइट हाऊसच्या प्रेस ब्रीफिंग रूममधल्या आसन व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे. जेणेकरून दोन व्यक्तींच्या बसण्यात काही अंतर राखलं जात आहे.