अयोध्येच्या निकालानंतर सर्वांनी संयम राखावे; शरद पवारांचे आवाहन

0

मुंबई: राज्यातील राजकीय परिस्थिती सध्या बिकट बनली असताना शरद पवारांच्या आजच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आज शरद पवार पत्रकार परिषदेत सरकार स्थापनेच्या बाबतीत मोठी घोषणा करतील असे बोलले जात होते. दरम्यान शरद पवारांनी पत्रकार परिषदेत अयोध्या प्रकरण, दिल्लीतील पोलिसांचे आंदोलन आणि राज्यातील परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मदत करण्यावरच भाष्य केले.

अयोध्या प्रकरणी निकाल लागणार आहे. निकाल लागल्यानंतर कोणीही कायदा हातात घेऊ नये, निकाल आपल्या विरोधात लागला किंवा निकाल आपल्या बाजूने लागला असे कोणीही समजू नये. न्यायव्यवस्था जो निर्णय देईल त्याचे स्वागत करून संयम बाळगण्याचे आवाहन शरद पवारांनी केले. अयोध्येचा निकाल लागल्यानंतर राज्य सरकारने आवश्यक ती सगळी खबरदारी घ्यावी असे आवाहन ही शरद पवारांनी केले.

दिल्ली पोलिसांच्या आंदोलनाला केंद्र जबाबदार
दिल्ली पोलीस आणि वकिलांमध्ये हाणामारी झाली होती, यानंतर दिल्लीत पोलीस प्रशासन विरुद्ध न्यायप्रशासन अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काल दिल्ली पोलिसांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावर शरद पवारांनी भाष्य केले. दिल्ली पोलिसांवर हल्ल्याची घटना ही चुकीची असून देशाची सेवा करणाऱ्यांचे मनोबल कमी करणे चुकीचे आहे. दिल्लीतील पोलिसांच्या आंदोलनाला केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका शरद पवारांनी केली. केंद्र सरकारला जबाबदारी टाळता येत नाही असा टोलाही शरद पवारांनी लगावला.

केंद्राने तातडीने मदत द्यावी
राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज असून केंद्र सरकारने तातडीने मदत द्यावी असे आवाहन शरद पवारांनी केले.