अवघ्या सहा मिनिटांत एमबीएचा पेपर फुटला

0

औरंगाबादेतील घटना; तीन विद्यार्थ्यांना पकडले

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सोमवारी झालेला एमबीएचा प्रथम सत्राचा पेपर व्हॉटसअ‍ॅपवर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली. विशेष म्हणजे, सिडकोमधील वसंतराव नाईक महाविद्यालय या परीक्षा केंद्रावरील शिपायांनी पेपर फोडणार्‍या विद्यार्थ्यांना रंगेहाथ पकडले होते. परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या पोलिसांनी या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर विद्यापीठाने हा पेपर रद्द करत नव्याने परीक्षा घेत असल्याचे जाहीर केले. परीक्षा सुरु झाल्यानंतर अवघ्या सहा मिनिटांत ’अकाऊंटिंग फॉर मॅनेजर’ विषयाची प्रश्नपत्रिका व्हायरल झाली होती. 200 हून अधिक सदस्य असलेल्या ’फ्यूचर मॅनेजर’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपवर ती शेअर झाली. या प्रकरणी पोलिसांनी तीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेत, त्यांच्याकडून दोन मोबाइल जप्त केले व गुन्हेही दाखल केले आहेत.

व्हॉटसअ‍ॅपवर पेपर केला व्हायरल
देवगिरी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख अमजद कलीम हा परीक्षा केंद्रावर होता. सकाळी 10 ते 1 या वेळेत त्याचा पेपर होता. प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर त्याने फोटो काढून ते ’फ्युचर मॅनेजर’ या ग्रूपवर शेअर केले. इतर दोघे दोघेजण झाडाखाली बसून उत्तरे लिहित असताना त्यांना शिपायाने हटकले. ते पळून जाण्याच्या बेतात होते. परंतु, शिपाई सतीश पवार, हनुमंत कोरडे, रवी गवळी यांनी विद्यार्थ्यांना पकडले. नंतर प्रश्नपत्रिका पाठवणार्‍याचा डीपी ट्रेस केला असता तो हॉल क्रमांक 6 मध्ये बसल्याचे आढळला. शेख अमजद कलीम याने तत्काळ हॉल तिकीट फाडून टाकले. नंतर तिघांना प्राचार्यांच्या कॅबिनमध्ये हजर करण्यात आले व या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर हा प्रकार केंद्राबाहेर आला होता.

विद्यापीठाकडून पेपर रद्द
पेपर फुटल्यानंतर विद्यापीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत, हा पेपर रद्द केल्याचे जाहीर केले. परीक्षा व मूल्यमापन नियंत्रण मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, उपकुल सचिव डॉ. प्रताप कुलावंत, प्राचार्य मजहर फारुखी यांनी तत्काळ परीक्षा केंद्राला भेट दिली. आजचा पेपर रद्द करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली. तसेच, विद्यापीठाकडून चौकशी समिती नेमण्याचीही घोषणा करण्यात येत असल्याचे नेटके यांनी सांगितले. आता हे प्रकरण राज्याच्या शिक्षण संचालकांपर्यंत पोहोचले होते.