‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात !

0

मुंबई: मराठी सिनेतारका सई ताम्हणकर स्टार असलेला मराठी चित्रपट ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ब्राह्मण महासंघाने सिनेमावर आक्षेप घेतला असून, चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी महासंघाकडून करण्यात आली आहे. अश्लील हा शब्द जरी मराठी भाषेत असला तरी सहसा सहजी आपण तो उच्चारत नाही. सिनेमाच्या नावातच अश्लील शब्द असल्यामुळे यातून अनेक संदर्भ निघतात. अशा शब्दांमुळे लोकांची लैंगिक भूक चाळवळी जाते आणि त्यामुळे समाजात विकृती वाढताना दिसते असे महासंघाने म्हटले आहे.

दरम्यान, ब्राह्मण महासंघाने सिनेमाच्या निर्मात्यांकडे नाव बदलण्याची मागणी केली. मात्र प्रदर्शनाची तारीख जवळ आल्यामुळे सिनेमाचं नाव बदलणं शक्य नसल्याचं उत्तर निर्मात्यांकडून देण्यात आलं. दरम्यान, जर निर्मात्यांनी सिनेमाचं नाव बदललं नाही तर सिनेमाला विरोध कायम राहील, असं महासंघाने स्पष्ट केलं. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आमची भूमिका स्पष्ट करूच आणि नाव बदलण्याची आमची मागणी का आहे हेही स्पष्ट करू असे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या सिनेमातील ‘सविता भाभी’ या पात्रावरून वाद सुरू झाला होता. सविता भाभी हे एका कॉमिकमधलं काल्पनीक पात्र आहे. त्यामुळं या पात्राच्या कॉमिक कॉपीराइटवरून सिनेमाच्या निर्मात्यांना निलेश गुप्ता यांनी कायदेशीर नोटीस पाठविली आहे.सविता भाभी या काल्पनीक पात्राचे कॉपीराइट आपल्याकडं असल्याचं निलेश गुप्ता यांनी म्हटलं आहे. कॉपीराइट्स माझ्याकडं असताना देखील सिनेमाच्या निर्मात्यांनी कोणतीही परवानगी घेतली नाही,असंही गुप्ता यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सिनेमा वादात अडकण्याची शक्यता आहे. सई ताम्हणकर या सिनेमात सविता भाभीची व्यक्तीरेखा साकारत आहे.