आंतरधर्मीय विवाह : एक फसवी संकल्पना

0

चेतन राजहंस

केरळच्या माकप सरकारने आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सुरक्षित घर’ ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत आंतरधर्मीय विवाह करणार्‍या जोडप्याला रहाण्यासाठी 1 वर्षासाठी घर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केरळच्या आरोग्य आणि सामाजिक न्यायमंत्री के. के. शैलजा यांनी विधानसभेत याची माहिती दिली. अशा प्रकारच्या जोडप्यापैकी एक व्यक्ती सरकारी नोकरीत असेल, तर त्या व्यक्तीचे स्थानांतर करण्याविषयी विशेष काळजी घेण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. असा निर्णय घेण्याची कारणमीमांसा सहसा सांगितली जात नाही. सांगितली गेलीच, तर ती एकांगी असते. त्यामुळेच वरकरणी आंतरधर्मीय विवाहांना अथवा आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन म्हणजे लोकशाहीचे बळकटीकरण वगैरे असे वाटले, तरी प्रत्यक्षात ते तसे नाही. उलट वर्णसंकर हा विषय थेट गुणसूत्रांशी निगडित असल्याने त्याकडे गंभीरपणे पहाणे आवश्यक आहे.

केरळ राज्य हे ‘लव्ह जिहाद’च्या विळख्यात सापडले आहे. ही समस्या तेथे इतकी मोठी आहे की, उच्च न्यायालय, उच्चस्तरीय अन्वेषण यंत्रणा यांनीही ‘लव्ह जिहाद’चे संकट मोठे असून, त्यासाठी हवालाद्वारे पैसा येत असल्याविषयी टिपणी केली होती. कोणत्याही भिन्न धर्मीय व्यक्तींमधील विवाहाला ‘आंतरधर्मीय विवाह’ म्हटले जात असले, तरी प्रत्यक्षात या आंतरधर्मीय विवाहांमध्ये मुलगी हिंदू आणि मुलगा अन्य धर्मीय असेच समीकरण सहसा पहायला मिळते. ज्याचा भारतीय समाजमनावर मोठा पगडा आहे. प्रत्येक आंतरधर्मीय लग्न फसवण्याच्या उद्देशाने झाले असेलच, असे नाही; पण म्हणून अपवादाला नियम बनवण्याची म्हणजे आंतरधर्मीय अथवा आंतरजातीय विवाहांचा डंका पिटण्याची अथवा त्यांना प्रोत्साहन देण्याची मुळीच आवश्यकता नाही.

शास्त्र जाणून घ्या

हिंदू धर्मामध्ये आंतरधर्मीय अथवा आंतरजातीय विवाह निषिद्ध मानले आहेत; पण त्यामागे उच्च-नीच अशी भेदभावाची वृत्ती नाही, तर प्रत्येक व्यक्तीचा आणि भावी पिढीच्या कल्याणाचा विचार आहे. इंडियन सायन्स काँग्रेसच्या 84 व्या वार्षिक संमेलनात वैज्ञानिकांनी ‘आंतरजातीय विवाह मानव स्वास्थ्यासाठी हानीकारक आहेत’, असे म्हटले होते. ‘भारताच्या पारंपारिक विवाहव्यवस्थेत ढवळाढवळ करण्याने जनस्वास्थ्यावर विपरित परिणाम होतील. आपल्या समूहात विवाह करण्यास प्रोत्साहित केले नाही, तर मानवाला गुणसूत्राच्या भयंकर क्षतीचे दुष्परिणाम भोगावे लागतील’, असे कोलकाता विश्‍वविद्यालयातील मानव-विज्ञान विभागामधील मानव गुणसूत्र या विषयाचे प्राध्यापक डॉ. देवप्रसाद मुखर्जी यांनी म्हटले होते. डीएनए तंत्राचे जनक आणि नोबेल पारितोषिक विजेते जेम्स वॅटसन यांनी पारंपरिक विवाह पद्धतीचे समर्थन करत अशा विवाहांमुळे गुणसूत्रसमूह अधिक लाभप्रद होतात, असे म्हटले होते. हिंदू संस्कृतीमध्ये सगोत्र विवाहही निषिद्ध मानले गेले आहेत. आधुनिक विज्ञानानेही सगोत्र विवाहांमुळे गुणसूत्रांमध्ये विविधता अल्प रहात असल्याने पुढच्या पिढ्यांमध्ये शारीरिक आजार उत्पन्न होतात, असे मानले आहे. या पार्श्‍वभूमीवर आंतरधर्मीय अथवा आंतरजातीय विवाहांना चालना देणे अयोग्य आणि घातकही आहे.

तथाकथित समानता

आंतरधर्मीय विवाहांचे समर्थन करणार्‍यांकडून नेहमी एक तर्क दिला जातो की, व्यक्ती म्हणून सर्व जण समान आहेत. धर्मापेक्षाही प्रेम मोठे आहे. अशा विवाहांमुळे धर्माधर्मांतील भेद मिटेल वगैरे वगैरे; पण जेव्हा असा विवाह केल्यानंतर हिंदू युवतीचे आयुष्य उद्ध्वस्त होते, तेव्हा मात्र तिच्या पाठिशी उभे राहायला कोणी जात नाही. जर सर्व धर्म समान आहेत, हे बिंबवणे हेच जर समर्थकांना सिद्ध करायचे असेल, तर या व्यक्ती बहुसंख्यांकांना डावलून जेव्हा अल्पसंख्यांकांवर सवलतींची खैरात केली जाते, केवळ अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले जाते, बहुसंख्यांकांच्या हिताचा बळी देऊन अल्पसंख्याकांना चुचकारले जाते तेव्हा का विरोध करत नाही? एकीकडे जाती निर्मूलनाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन द्यायचे हा कुठला प्रकार? जर खरेच सर्व जाती समान असल्याचे दाखवून द्यायचे असेल, तर सर्वप्रथम जातीधारित आरक्षण संपवून टाकायला हवे. जर व्यक्ती म्हणून कोणत्याही धर्माचा नागरिक कायद्यासमोर सारखाच आहे हे दाखवून द्यायचे असेल, तर बहुसंख्यांकांवर अन्याय करणार्‍या राज्यघटनेतील कलमांमध्ये सुधारणा करायला हवी. आंतरधर्मीय विवाहाने समाज पुढारलेला होत नाही किंवा सामाजिक समरसता साध्य होत नाही, तर धर्माचरणाने आणि धर्मपालनाने समाज समृद्ध आणि विकसित होतो. म्हणूनच आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देणे, हा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे.