Wednesday , December 19 2018
Breaking News

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू शैलेश नेर्लीकरांचे निधन

कोल्हापूर । आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू, अशी ख्याती असलेले दिव्यांग बुद्धिबळपटू शैलेश मधुकर नेर्लीकर यांचे रविवारी रात्री साडेदहा वाजता निधन झाले. शरीराला 100 टक्के दिव्यांगत्वामुळे अक्षरशः जमीन समांतर झोपून जिद्दीने त्यांनी बुद्धिबळ खेळून देशाचे नाव सातासमुद्रापार पोहोचवले. मात्र, ग्रँडमास्टर होण्याचे स्वप्न त्यांचे अधुरेच राहिले. शैलेश नेर्लीकर यांचा 21 मे 1977 रोजी जन्म झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील नेर्ली येथे ते राहत होते. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते टीव्ही पाहत बसले होते. अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याची प्राणज्योत मालवली. त्यांनी आपल्या तेवीस वर्षांच्या कारकिर्दीत तीन आंतरराष्ट्रीय, 8 ते 10 राष्ट्रीय व शेकडो राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धा खेळून त्यांनी बुद्धिबळ क्षेत्रात नाव कमविले होते.

शैलेश नेर्लीकर वयाच्या आठ वर्षांपर्यंत इतर मुलांप्रमाणे धडधाकट होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या शरीरावर काळे ठिपके दिसून आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांच्या शरीरात कॅल्शियमचा अभाव दिसला. त्यामुळे त्यांना वरून कॅल्शियम दिले गेले. मात्र त्यांचे शरीर कालांतराने ताठर झाल्याने त्यांना शंभर टक्के दिव्यांगत्व आले. यातून त्यांना बसणे व उठणेदेखील अशक्य झाले. त्याच्याबाबतीत घडलेला हा प्रकार पाहून घरच्यांना जबर धक्का बसला. त्याचे वय वाढू लागले तसे त्यांचे मन दिव्यांगात्वातून अन्यत्र रमावे यासाठी वडील मधुकर नेर्लीकर आणि आई सरला नेर्लीकर यांनी त्यांना बुद्धिबळचा पट आणून दिला. या पटावर घरच्या सदस्यांसोबत अथरुणांवरच झोपून ते बुद्धिबळ खेळू लागलेत.

वृत्तपत्रांमधून छापून येणार्‍या बुद्धिबळच्या स्पर्धेच्या बातम्या पाहून शैलेशनेही वयाच्या चौदाव्या वर्षांपासून स्पर्धा खेळण्यास सुरुवात केली. ते शंभर टक्के दिव्यांग असून त्याची आई सरला नेर्लीकर त्यांना अंगावर उचलून, स्पर्धा खेळण्यास नेत होत्या. पुढील काही वर्षांत ते दुसर्‍यांना चांगली लढत देऊ शकतील इतक्या तयारीचे बुद्धिबळपटू झालेत. विविध स्पर्धा खेळल्यानंतर त्यांना 2009 साली आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त झाले. 2015 साली तर तामीळनाडूतील त्रिचनापल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय दिव्यांग बुद्धिबळ स्पर्धेतदेखील त्यांनी यश मिळवले. या स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक पटकावून सर्वांनाच धक्का दिला. वर्ष 2016 साली जर्मनीत झालेल्या जागतिक दिव्यांग बुद्धिबळ स्पर्धेसाठी ऑफर आली होती. ही स्पर्धा खेळल्यानंतर मलेशिया, सिंगापूर येथे झालेल्या खुल्या गटातील बुद्धिबळ स्पर्धा खेळण्याचीही त्यांना संधी मिळाली.

About admin

हे देखील वाचा

भारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटी: ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा चिवट खेळी सुरु

पर्थः ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात आजपासून दुसरी कसोटी पर्थच्या मैदानावर खेळली जात आहे. या मालिकेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!