आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी मान्यवरांशी चर्चा

0
मराठा समाजातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी केली चर्चा, अनेक मान्यवरांची अनुपस्थिती 
मुंबई: मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतलेली दिसून येते. त्यात आधी मूक मोर्चे काढणाऱ्या आंदोलकांनी ठोक मोर्चे काढण्यास सुरुवात केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने आपल्या हालचाली वेगवान केल्या आहेत. मराठा आंदोलनांची कोंडी फुटावी आणि चर्चेतून  मार्ग निघावा या हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सह्याद्रीवर बैठक बोलावली होती. या बैठकीला मराठा समाजातील २६ मान्यवर उपस्थित होते. यावेळी मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून, त्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री  फडणवीस यांनी  दिली. या बैठकीत मराठा समाजाच्या लघु आणि दीर्घ उपाययोजनावर चर्चा झाली. आंदोलनात हिंसा होऊ नये यासाठी दोन्ही बाजूनी आवाहन करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले कि, “या बैठकीसाठी 20 ते 22 मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म उपाययोजना यावर चर्चा झाली. संयुक्त निवेदनाद्वारे म्हणणे मांडण्यात येणार आहे. मान्यवरांनी मोलाच्या सूचना दिल्या. तर आम्ही सरकारच्या योजना त्यांना सांगितल्या. निवदेनाद्वारे शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरक्षण देण्याबाबत सकारात्मक आहोत. कायदेशीर आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आंदोलनात हिंसा होऊ नये यासाठी आवाहन करण्यात आलं”, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. “सर्व विचारवंतांसोबत चर्चा केली, सूचनांच्या नोंदी घेतल्या. मराठा आंदोलन सुरु आहे, त्याबाबत विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत बैठक घेतली. या बैठकीत समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी चर्चा झाली. मराठा आरक्षण लवकरात लवकर मिळावं याबाबत चर्चा झाली. आंदोलनात हिंसा होऊ नये, आत्महत्या होऊ नये याबाबत आवाहन करण्यात आले, अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. बैठकीत रावसाहेब दानवे यांनी मराठा समाजासाठी सरकारने काय केले त्याची माहिती दिली. तसेच, मराठा आरक्षणासाठी सरकार काय पावले उचलत आहे त्याची माहिती दिली. मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावे यासाठी या मान्यवरांनी समाजाला विनंती करावी, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे,  विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, निवृत्त न्यायाधीश बी.एन देशमुख अमोल कोल्हे, उद्योजक भैरवनाथ ठोमरे, पोपटराव पवार, लेखक सदानंद मोरे, कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, सुवर्ण कोकण संस्थचे डॉ. सतीश परब, उद्योजक बी.बी.ठोंबरे, सुरेश हावरे, प्रवीण कदम, हर्षवर्धन निंबाळकर, वसंत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. मराठा समाजाचे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी मराठा समाजातील मान्यवरांसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आणि त्यांची मते जाणून घेतली.
अनेक मान्यवरांची अनुपस्थिती 
या बैठकीला अन्य अनेक मराठा समाजातील मान्यवरांना देखील निमंत्रण देण्यात आले होते. मात्र त्यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिल्याची चर्चा आहे. तर या चर्चेशी आमचा कसलाही संबंध नसल्याचे मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी स्पष्ट आहे. या  बैठकीला जाण्यास कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी नकार दिला आहे. आरक्षणावर तोडगा काढणासाठी मुख्यमंत्र्यांकडून कोल्हापूरच्या शाहू महाराजांसह इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, प्रतापसिंह जाधव यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र मराठा आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर या तिघांनीही बैठकीस जाण्यास नकार दिला. सोबतच शेकापचे ज्येष्ठ नेते एन.डी पाटील, अभिनेते सयाजी शिंदेही गैरहजर राहिले. 58 मराठा मोर्चे काढूनही मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाच्या भावना कळाल्या नाहीत, अशा बैठकीत जाऊन आम्ही काय वेगळे सांगणार, असे सांगत शाहू महाराजांनी सरकारला लक्ष केले.
लवकर विधीमंडळ अधिवेशन बोलवा – नवाब मलिक 
मागासवर्गीय आयोगाचा अहवाल लवकर प्राप्त करुन विधीमंडळाचे अधिवेशन बोलावावे आणि तसा प्रस्ताव मंजुर करुन केंद्राकडे शिफारस करुन घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा आग्रह सरकारने धरला पाहिजे. आमचं स्पष्ट मत आहे की,पार्लमेंटमध्ये आम्ही तर पाठिंबा देवूच परंतु इतर पक्षाच्या लोकांशी शरद पवारसाहेब बोलून त्यांचाही पाठिंबा मिळवण्यामध्ये शरद पवारसाहेब भूमिका मांडतील अशी माहिती राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारने लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे याबाबत नवाब मलिक बोलत होते. मराठा समाजाच्या समन्वयकाची बैठक झाली असून त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी कोणत्याही प्रकारची बैठक किंवा चर्चा करणार नाही असा निर्णय घेतला आहे. मराठा समन्वयकांची मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची तयारी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत संवाद सुरु ठेवले पाहिजेत. त्या लोकांची मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची तयारी असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करुन हा प्रश्न निकाली काढण्यासाठी पाऊले उचलली पाहिजेत असेही नवाब मलिक म्हणाले.