आकस्मिक औषध खरेदीसाठीच्या अधिष्ठातांच्या मर्यादा वाढविल्या

0
राज्यातील आरोग्य सुविधांचे मॅपिंग करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : राज्यातील शासकीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये औषधांची कमतरता काही वेळेस जाणवते. विशेषता ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्य केंद्रामध्ये पावसाळ्याच्या काळात औषधांची कमतरता भासू नये यासाठी आपत्कालिन परिस्थितीत स्थानिकस्तरावर औषध खरेदीचे अधिकार वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना आकस्मिक औषध खरेदीसाठी 5 हजार रुपयांपर्यंतच्या मर्यादा आहेत त्या वाढवून आता एक लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत उपस्थित होते.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या आरोग्य सुविधांचे मॅपींग सल्लागार संस्थेमार्फत करण्यात यावे. जेणेकरून आवश्यक त्या उपाय योजना करण्यासाठी त्याचा लाभ होऊ शकेल, असे निर्देश देतानाच शासकीय रुग्णालयांमध्ये येत्या काही काळात औषधांची कमतरता भासू नये म्हणून स्थानिकस्तरावर औषध खरेदीच्या मर्यादा वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. जिल्ह्यांमध्ये असलेल्या आरोग्य सुविधांचे मॅपिंग करण्यासाठी सल्लागार संस्थेची नेमणूक करून त्यामार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. आयुष्यमान भारत योजनेत सहभागासाठी राज्यात 15 ऑगस्टपूर्वी सामंजस्य करार करण्यात यावा आणि राज्याची महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना या दोन्ही योजना परिमाणकारक पद्धतीने राबवाव्यात, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शासनाच्या विविध विभागांना लागणारी औषधे हाफकीन महामंडळामार्फत खरेदी करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. त्यानुसार या महामंडळाचे सक्षमीकरण करून त्यांना आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देतांनाच खरेदीची प्रक्रिया गतिमान करावी. ई-निविदेचा कालावधी कमी करतानाच औषध खरेदी करताना खरेदी धोरणात आवश्यक तो बदल करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.