आज एमपीएससी परीक्षा

0 1

जळगाव – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा उद्या दि. २४ रोजी होणार आहे. ३० उपकेंद्रावर ही परीक्षा होणार असून सुमारे साडेनऊ हजार उमेदवार या परीक्षेसाठी पात्र आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा उद्या २४ रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ३० उपकेंद्र तयार करण्यात आले असून या परीक्षा केंद्रावर ९ हजार ५५२ परीक्षार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणार आहे. परीक्षेमध्ये कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, तसेच परीक्षार्थींवर नजर ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून २ भरारी पथक तयार करण्यात आले आहे. या भरारी पथकाची संपूर्ण परीक्षा केंद्रावर नजर राहणार आहे.

११० पर्यवेक्षकांची नियुक्ती
जिल्ह्यातील ३० परीक्षा केंद्रावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार आहे. या केंद्रावर ११० पर्यवेक्षकांसह ४३० समवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे परीक्षेत काही अडचणी असल्यास जिल्हा प्रशासनाकडून ८ समन्वय अधिकारी देखील त्याठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे.

परीक्षा केंद्राच्या १०० मिटर पर्यंत नाकाबंदी
आयोगाच्या परीक्षा केंद्राच्या शंभर मिटर पर्यंत सार्वजनिक टेलिफोन, फॅक्स, झेरॉक्स, ध्वनी क्षेपके लावण्यास बंदी असून त्या परिसरात अनधिकृत वाहन व व्यक्तीस जाण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास त्या संबंधित व्यक्तीवर संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.