आज देशभरात चक्क ८२१ रेल्वे रद्द !

0

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेकडून आज देशभरातील चक्क ८२१ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द झालेल्या रेल्वेमध्ये पॅसेंजर ट्रेनचा भरणा अधिक आहे. अर्थातच, या रेल्वेचे बुकींग केलेल्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे आणि आपल्या प्रवासासाठी दुसऱ्या पर्यायाचा वापर करावा लागणार आहे.

रद्द झालेल्या रेल्वेंत पॅसेंजर, मेल, स्पेशल, जनशताब्दी, संपर्क क्रांती, हमसफर, सप्त क्रांती एक्सप्रेस आणि डबल डेकर ट्रेनचाही समावेश आहे. यामध्ये दिल्लीला हावडा, छपरा, पाटणा, गोरखपूर, लखनऊ, वाराणसी यांसारख्या अनेक मोठ्या शहरांना जोडणाऱ्या रेल्वेचाही समावेश आहे.

रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, २ मार्च रोजी ५९४ रेल्वे पूर्णत: रद्द करण्यात आल्यात तर २२७ रेल्वे अंशत: रुपात रद्द करण्यात आल्यात. याशिवाय २४ रेल्वेच्या वेळेतही बदल करण्यात आलेत तर ३१ रेल्वेचे मार्ग बदलण्यात आलेत.