आज पाणी प्रश्नी पंकजा मुंडेंचे उपोषण; फडणवीस यांच्यासह भाजपनेते होणार सहभागी

0

औरंगाबाद : मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे ह्या आज सोमवारी एकदिवशी लाक्षणिक उपोषण करणार आहेत. औरंगाबादमधील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सकाळी 10 वाजता हे उपोषण सुरु होणार आहे. गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावर झालेल्या कार्यक्रमातून मराठवाडा पाणी प्रश्नी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते.

पंकजा मुंडेंच्या या एक दिवशीय उपोषणात माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सहभागी होणार आहे. या उपोषणात किमान अडीच ते तीन हजार कार्यकर्ते सहभागी होतील, असे नियोजन करण्यात येत आहे. उपोषण आता गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे नसल्याने भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यात सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे.