आज व उद्या महाअधिवेशन

0 3

लाडशाखीय वाणी समाजाचे

मारुंजीत मुख्यमंत्री, पवार, विखे, शेट्टी येणार

पिंपरी-चिंचवड : लाडशाखीय वाणी समाज महासंघाच्या वतीने शनिवारी व रविवारी अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाचे राष्ट्रीय महाअधिवेशन मारूंजी येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनाला देशभरातून 80 हजारांहून जास्त सभासदांनी ऑन लाईन नोंदणी केली असून पन्नास हजारांहून जास्त समाज बांधव उपस्थित राहतील अशी माहिती महाअधिवेशनाचे कार्याध्यक्ष कैलास वाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहकार्याध्यक्ष अनिल चितोडकर, खजिनदार शामकांत शेंडे, शामकांत कोतकर, प्रदेश युवक समन्वयक निलेश पूरकर, पुणे महानगर समन्वयक विवेक शिरोडे आदी उपस्थित होते.

उद्योजकता संमेलन

अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात आयोजित ‘उद्योजकता संमेलनाचे’ उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी 12:45 वाजता होईल. यावेळी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, पालकमंत्री गिरीष बापट, पुणे महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव उपस्थित असतील. मार्गदर्शन सत्रात ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर (समाज उभारणीत युवा वर्गाचा सहभाग), मुंबईचे विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश (करिअर व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन), पर्सिस्टंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आनंद देशपांडे (आयटी क्षेत्र : काल, आज आणि उद्या), जेष्ठ उद्योजक सतीश मगर, संजीव बजाज, अनुज पुरी (बांधकाम व विपणन व्यवसाय भविष्यातील संधी), मनिष गुप्ता (यशस्वी उद्योजक, स्वप्ने व वेळेचे नियोजन), संजय पाटील, किशोर मासुरकर, सुरेश जाधव (औषध क्षेत्रात संधी व विकास) मार्गदर्शन करणार आहेत. संमेलनाचा समारोप माजी मसूलमंत्री एकनाथ खडसे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत होईल.

पवारांच्या उपस्थितीत समारोप

रविवारी सकाळच्या सत्रात प.पू. गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे (समाजाचे संस्कार व एकीचे बळ), बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड (शेती व उद्योग व भविष्यातील संधी), भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा (एकीने समाजाचा विकास कसा साधाल) मार्गदर्शन करणार आहेत. अधिवेशनाचा समारोप दुपारी 4:30 ला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षीय भाषणाने होईल. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, राजू शेट्टी, श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार मेधा कुलकर्णी, लक्ष्मण जगताप आदी उपस्थित राहणार आहेत. शनिवारी व रविवारी सायंकाळी 7 वाजता सायली चितोडकर, अमृता दहिवेलकर, मिस्त्रु बर्धन, संदीप उबाळे, जितेंद्र भुरुक, अश्‍विनी कुरपे, प्रशांत नासेरी, कोमल कनाकिया यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.