आझम पानसरेंच्या पुत्राला राष्ट्रवादीत घेऊन नवी खेळी

0

पिंपरी-राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी महापौर आझमभाई पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे यांना राष्ट्रवादीत घेऊन पक्षाने बेरजेचे राजकारण केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मावळ आणि शिरुरमधील उमेदवाराला याचा फायदा होऊ शकतो. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच आझमभाईंची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. ही भेट राष्ट्रवादीसाठी फायदेशीर ठरली आहे.

मावळ लोकसभा मतदार संघातून शरद पवारांचे नातू, अजित पवारांचे पुत्र पार्थ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे मावळात पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे शरद पवार, अजित पवार यांनी बेरजेचे राजकारण करायला सुरुवात केली. भाजपमध्ये गेले तरी पवार कुटुबियांशी जिव्हाळ्याचे संबंध जपणारे शहरातील ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांची शरद पवार, अजित पवार यांनी भेट घेतली होती.

त्यांच्या प्रकृतीची विचारपसू केली होती. त्यानंतर पार्थ पवार यांच्या प्रचाराचा झालेल्या सभेला भाईंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचवेळी पानसरे पुन्हा राष्ट्रवादीत जातील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. काल त्यांचे पुत्र निहाल यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पानसरे शहरातील मोठे नेते आहेत. अल्पसंख्याक समाज त्यांच्या पाठीमागे आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाचा राष्ट्रवादीत प्रवेश हा भाजपला मोठा धक्का मानला जातो.

पानसरे सध्या राजकारणापासून अलिप्त असले तरी शहरात त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. बहुजन आणि मुस्लिम समाजात आझमभाईंचे पाठीराखे आहेत. पिंपरी मतदार संघात त्यांचे मोठे वर्चस्व आहे. चिंचवड आणि भोसरी मतदार संघात त्यांच्या अनुयायांची संख्या अधिक आहे. तेथील मुस्लिम मते राष्ट्रवादीला मिळू शकतात. भाजपकडून त्यांना मानाचे पान दिले न गेल्याने त्यांच्याबाबत सहानुभूतीचे वातावरण आहे. पानसरे समर्थकांनी सोशल मीडियातून नाराजी व्यक्त करत पानसरेंना भाजपमधून बाहेर पडण्यासाठी आर्जव केले होते. त्यातच पानसरे यांच्या मुलाने राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी काळात पानसरे स्वगृही परतण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

गेल्या निवडणुकीत पानसरे यांनी युतीच्या उमेदवाराला मदत केल्याची चर्चा होती. त्यामुळे युतीच्या उमेदवाराला पिंपरी-चिंचवड शहरातून मताधिक्य मिळाल्याचे बोलले जाते. यावेळी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मात्र पानसरे यांचे पुत्र निहाल यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाईंचे पाठीराखे राष्ट्रवादीला साथ देण्याची शक्यता आहे. त्यामुळे युतीच्या उमेदवाराच्या अडचणीत भर पडली जाईल. पवार घराण्याशी जिव्हाळ्याचे संबंध असतानाही फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिका निवडणुकीवेळी आझमभाई पानसरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना सोबत घेऊन भाजपने महापालिकेत सत्ता आणली. परंतु सत्ता आल्यानंतर पानसरे यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यांच्या समर्थकांना सन्मान दिला जात नव्हता. भाईंना देखील निर्णय प्रक्रियेतून ‘कॉर्नर’ केले जाऊ लागले. भाजप प्रवेशाला दोन वर्षाचा काळ लोटला तरी कोणतेही पद दिले नाही. त्यांचे पुनर्वसन केले नाही. त्यामुळे भाईंचे समर्थक नाराज होते. भाजपला रामराम करण्याची मागणी केली जात होती. त्यातच पानसरे यांचे पुत्र निहाल यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पुत्राला पुढे पाठवून आपण मागून आलोच असा संदेश तर पानसरे यांनी दिला नाही ना ? अशी चर्चा सुरु झाला आहे. पानसरे यांच्या पुत्राचा राष्ट्रवादीत प्रवेश म्हणजे भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. भाजपची चिंता वाढली आहे.