आनंदनगरात सेवानिवृत्त बँक व्यवस्थापकासह भाडेकरुचे घर फोडले

0 1

रक्कम न दागिणे नसल्याने रिकामे हाते परतले चोरटे

जळगाव –महिनाभरापासून विदेशात मुलीकडे गेलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सेवानिवृत्त सहाय्यक व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर देवराम चौधरी (रा. प्लॉट नं 22, आनंदनगर) यांच्यासह त्यांच्या शेजारील बाहेरगावी असलेल्या भाडेकरुचे बंद घर फोडल्याची घटना रविवारी सकाळी 7 वाजता समोर आली आाहे. दरम्यान दोन्ही घरांमध्ये रोकड, दागिणे असा कुठलाही एैवज न मिळाल्याने चोरट्यांना रिकामे हाते परतावे लागले.

स्वामी समर्थ समर्थ केंद्राजवळ आनंदनगरात रस्त्यालगत सेवानिवृत्त ज्ञानेश्‍वर चौधरी हे पत्नीसह वास्तव्यास आहे. मुलगा पुण्याला नोकरीला आहे. तर मुलगी शितलचे लग्न झाले असून ती अमेरीकेत वास्तव्यास आहेत. चौधरी यांनी शेजारील खोली जळगाव पाचोरा रस्त्यावरील जैन व्हॅलीमध्ये नोकरीला असलेल्या सागर सिताराम साळुंखे यांना भाडेकरारावर दिली आहे.

महिनाभरापासून दाम्पत्य विदेशात
ज्ञानेश्‍वर चौधरी हे पत्नीसह महिनभरापासून अमेरीकेत असलेली मुलगी शितलकडे गेले आहे. त्यांचे समोरील दरवाजा आतून बंद करुन बाजूने लोखंडी गेट व लाकडी दरवाजाला कुलूप लावले होते. रविवारी सकाळी त्याच्याकडे कामाला असलेली सुष्मा ही कामवाली बाई आली असता, तिला लोखंडी गेट व लाकडी दरवाजाचा कोयंडा कापलेला व दरवाजा तुटलेला दिसला. तिने तत्काळ चौधरी यांचे हनुमान नगरातील साडू सुनील जगन्नाथ चौधरी यांना घरी जावून प्रकार कळविला. सुनील चौधरी यांनी विदेशात असलेले ज्ञानेश्‍वर चौधरी यांना घटना कळविली व घर पाहणीसाठी आनंदनगर गाठले. घर तपासले असता कपाटांमधील सामान अस्ताव्यस्त फेकलेला होता. बेडरुम, हॉल, तसेच इतर खोल्यांमध्ये चोरट्यांनी तपासणी केली. मात्र कुठलाच दागिणे अथवा रोकड घरात नसल्याने काहीच चोरी झाल्याचे चौधरी यांचे म्हणणे आहे.

सासर्‍याकडे जावयाचा मुक्काम अन् घरफोडी
ज्ञानेश्‍वर चौधरी यांच्या घरात सागर साळुंखे भाडेकरारावर राहतात. साळुंखे हे पत्नीसह वास्तव्यास आहे. त्यांची पत्नी प्रसूतीसाठी शहरातील इंद्रप्रस्थनगरात असलेल्या माहेरी गेली आहे. शनिवारी कामावरुन परत आल्यानंतर साळुंखे हे सासर्‍यांकडे जेवणासाठी गेले. जेवणानंतर सासर्‍यांच्या मंडळींच्या आग्रहास्तव तसेच दुसर्‍या दिवशी रविवारी सुटी असल्याने मुक्कामी थांबले. रविवारी सकाळी 8 वाजता त्यांना घरमालक ज्ञानेश्‍वर चौधरी यांचा चोरीझाल्याबाबत फोन आल्याने ते साळुंखे आनंदनगरातील घरी आले. चोरट्याने चौधरी यांच्या घरात तपासणी करुन साळुंखे यांच्यासमोरील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त केला. त्याच्याही घरात एैवज नसल्याने काहीही चोरी झाले नसल्याचे साळुंखे यांनी सांगितले.

रामानंदनगर पोलिसांनी केली पाहणी
चोरट्यांनी कोयंडा कापून घरात प्रवेश केला. यानंतर जाताना घरांची तोडलेली कुलूप समोरील मोकळ्या जागेत फेकले होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी याच परिसरात स्वामी समर्थ केंद्रासमोर सेवानिवृत्त बँक कर्मचार्‍यासह त्याच्या भाडेकरुचे घर फोडले होते. मात्र याठिकाणीही चोरट्यांच्या हाती काही लागले नव्हते. आता पुन्हा सेवानिवृत्त बँक कर्मचार्‍याचे घर फोडल्याने चोरट्यांनी रेकी करुन यानंतर घरे फोडल्याची शक्यता आहे. दरम्यान या परिसरात पोलीस नियमित गस्त असून गस्तीच्या काळात चोरीच्या घटना घडत असल्याने चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. तक्रारीनंतर रामानंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.