आभासी राष्ट्रवाद विरूद्ध विकासाची निवडणूक !

0

राष्ट्रावाद विरूद्ध विकास, अशी लढवली गेलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दिल्लीकरांनी भाजपा व काँग्रेसच्या हिंदू-मुस्लिमांच्या राजकारणापेक्षा विकासाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या पाच वर्षापासून सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत देत दिल्लीकरांनी सत्तेवर बसण्याचा कौल दिल्यानेे अरविंद केजरीवाल सलग तिसर्‍यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, हे आता स्पष्ट झाले आहे. निकालानंतर दिल्लीत कोणाचे सरकार स्थापन होणार, पुन्हा केजरीवाल सरकार कमबॅक करणार का? भाजप आणि काँग्रेसची कामगिरी कशी असेल? आपची हॅट्ट्रिक भाजप रोखणार का? मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज खरे ठरणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे संपूर्ण देशाला मिळाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढणार्‍या भाजपाने ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची केली होती. यामुळे सहाजिकच दिल्लीच्या तख्तावर कोण विराजमान होतो? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते.

भारतासह जगभरातील तरुणाईला 14 फेब्रुवारी अर्थात ‘व्हॅलेंटाइन डे’चे वेध लागले आहे. मात्र खर्‍या अर्थाने यंदाचाही ‘व्हॅलेंटाइन डे’ केजरीवाल यांना लकी ठरला आहे. याआधी 2013 आणि 2015 साली देखील दिल्ली विधानसभा निवडणुकीवेळी ‘व्हॅलेंटाइन डे’ केजरीवालांच्या राजकीय आयुष्यात महत्वाचा ठरला होता. त्याची हॅट्ट्रिक होत 2020 मध्येही केजरीवाल यांना दिल्लीकरांनी मुख्यमंत्रिपदाचे गिफ्ट दिले आहे. 2013 साली दिल्लीत 4 डिसेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम झाला होता आणि 8 डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाले होते. विधानसभेच्या 70 जागांपैकी भाजपाला 31, तर आम आदमी पक्षाला 28 जागांवर यश मिळाले होते. काँग्रेसला 8 जागा मिळाल्या होत्या. सत्ता स्थापन करण्यासाठी केजरीवालांनी काँग्रेसची मदत घेतली होती. अरविंद केजरीवाल यांनी 28 डिसेंबर रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, काँग्रेस आणि ‘आप’मधील तणाव पुढे वाढत गेला. काँग्रेसने केजरीवाल सरकारला केवळ बाहेरुन पाठिंबा दिला होता. त्यानंतर केजरीवालांनी 14 फेब्रुवारी 2014 साली मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. अवघ्या 49 दिवसांत ‘आप’चे सरकार कोसळले होते. यानंतर 12 जानेवारी 2015 रोजी निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. 7 फेब्रुवारी रोजी मतदान होऊन 10 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर झाले होते. या निवडणुकीत आपने सर्व राजकीय विश्लेषकांना आवाक करत ऐतिहासिक विजय प्राप्त केला.

दिल्लीच्या 70 जागांपैकी 67 जागांवर आपने मुसंडी मारली तर भाजपाला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला तर खातेही उघडता आले नव्हते. त्यावेळी अरविंद केजरीवाल यांनी 14 फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानात दिल्लीकरांच्या साक्षीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर एका वर्षानंतर केजरीवालांनी 14 फेब्रुवारी या दिवसाचे महत्व कथन करणारे एक ट्विट केले होते. ‘गेल्या वर्षी याच दिवशी दिल्लीकरांना ‘आप’वर प्रेम जडले होते. आता नाते आणखी घट्ट आणि कधीही न तुटणारे होणार आहे’, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. आता योगायोग म्हणा वा दुसरे काही मात्र, पुन्हा एकदा व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी 2020मध्ये पुन्हा एकदा यश संपादन केले आहे. 14 फेब्रुवारीलाच ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अनेक मुद्यांनी ही निवडणूक भाजप, काँग्रेस व आपसाठी प्रतिष्ठेची होती. 2015 ला आपने 70 पैकी 67 जागा जिंकल्या होत्या. यावेळीही सरकारी शाळा, मोहल्ला क्लिनिक, मोफत पाणी आणि वीज या मुद्यांवर आपने प्रचार गाजवला. अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या कामावरच पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचे आपच्या कार्यकर्त्यांना मतदारांना सांगितले. याच वेळी भाजपने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर न करता निवडणूक लढवली. त्याची सर्व सूत्रे भाजपातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हाती होती.

भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रथीमहारथींना दिल्लीच्या रणसंग्रामात उतरवले मात्र, भाजपाने जी चूक मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्रात केली तीच दिल्लीतही करत प्रचारात केवळ राष्ट्रीय मुद्यांना हात घातला. यामुळे दिल्ली निवडणुकीत देशप्रेमी व देशद्रोही असे दोन ध्रुवीकरण झालेले दिसले. यात हिंदू-मुसलमानांमध्ये भांडणे लावून त्यावर राजकीय पोळी शेकण्याचा किळसवाणा प्रकारही पाहायला मिळाला. शाहीन बाग इथे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसनेही प्रचंड धडपड केली. यामुळे ही निवडणूक राष्ट्रवाद विरुध्द विकास अशी झाल्याचे चित्र शेवटच्या टप्प्यात निर्माण झाले होते. या आरोप प्रत्यारोपांच्या चिखलफेकीत अरविंद केजरीवाल यांनी मात्र, गत पाच वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. त्यांनी मोफत वीज, पाणी यासह अन्य लोकप्रिय घोषणाही केल्या ज्या दिल्लीकरांच्या पसंतीला उतरल्याने आपला यश मिळाले. यामुळे दिल्ली काबीज करण्याचे भाजपाचे स्वप्न यंदाही अधुरेच राहिले. भाजपाने दिल्लीत अखेरचा विजय पहिल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे 1993 ला मिळवला होता. या एकाच टर्ममध्ये भाजपाने मदन लाल खुराना, साहिब सिंग वर्मा आणि सुषमा स्वराज हे तीन मुख्यमंत्री दिले होते. यानंतर सलग तीन वेळा काँग्रेसने दिवंगत नेत्या शीला दीक्षित यांच्या नेतृत्त्वात सत्ता मिळवली. 2013 आणि 2015 ला केजरीवाल मुख्यमंत्री झाले. आता दिल्लीतील तीन महापालिका आणि 7 लोकसभा मतदारसंघातही भाजपचे वर्चस्व आहे पण विधानसभेवर झेंडा फडकवण्याचे भाजपचे स्वप्न यावेळीही अपूर्ण राहिले असले तरी त्यांच्या समाधानासाठी एक चांगली बाब म्हणजे, गेल्या पंचवार्षिकच्या तुलनेत भाजपाच्या जागा व मतदानाची टक्केवारी देखील वाढली आहे.

निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला आहेच मात्र काँग्रेसचा तर पूर्णपणे सुफडा साफ झाला आहे. महाराष्ट्रात काँग्रेससोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांनी सोयीस्कर भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशद्रोह्यांना मतदान करू नका असे आवाहन केले होते. दिल्लीच्या जनतेने त्याचे ऐकले असून भाजपला देशद्रोही घोषित करून टाकले आहे’, अशा शब्दात टीका केली मात्र दिल्लीकरांनी काँग्रेसलाही नाकारले आहे, हे ते सोईस्कररित्या विसरले. शिवसेना नेते अनिल परब यांनीही भाजपावर टीका केली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही पक्ष निवडणुकीच्या रिंगणात नव्हतेच. हे राजकारण कधीच थांबणार नाही मात्र या प्रस्थापित पक्षांच्या राजकीय चिखलफेकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने मिळवलेले यश कितीतरी पटीने मोठे आहे. या यशानंतर केजरीवाल यांचे राजकीय वजन निश्चितपणे वाढले आहे.