“आमच्याकडे ज्योतिरादित्य होणार नाही, तुम्ही सांभाळ”; अजित पवारांचा भाजपला टोला

8

मुंबई: मध्य प्रदेशातील कॉंग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील कॉंग्रेस सरकार मोठ्या संकटात सापडले आहे. सरकार जाण्याची भीती कॉंग्रेसमध्ये आहे. यावरून आता महाराष्ट्रात देखील राजकीय समीकरण बदलेल असे बोलले जात आहे. यावरूनच भाजप नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुंनगंटीवार यांनी काल विधानसभेत महाविकास आघाडी सरकारचा चिमटा काढला होता. एखादा ज्योतिरादित्य सिंधिया महाराष्ट्रातही येईल आणि सरकार कोसळेल अशा शब्दात सुधीर मुंनगंटीवार यांनी सरकारला डिवचले होते. दरम्यान यावर आज शुक्रवारी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पलटवार केला आहे. “तुमच्या हातातील सत्ता गेली आहे, आता तुमच्यातील आमदार आमच्याकडे येण्याच्या तयारीत आहेत, आमच्याकडे ज्योतिरादित्य सिंधिया होणार नाही तुम्ही सांभाळ. तुमच्याकडेच ज्योतिरादित्य सिंधिया होणार नाही याची काळजी घ्या” असा टोला अजित पवार यांनी लगावला.

काल विधानसभेत सुधीर मुंनगंटीवार यांनी “आम्ही शब्द पाळला नाही म्हणून शिवसेनेने फारकत घेतली. त्याचा फायदा राष्ट्रवादी-कॉंग्रेसने घेतल्याचे वक्तव्य केल्याचे वृत्त माध्यमातून आले होते. ” यावरून देखील अजित पवारांनी सुधीर मुंनगंटीवार यांचा चिमटा घेतला. “शिवसेनेला फसवल्याची चूक तुम्ही केली, आता चुकीला माफी नाही” असे म्हणताच सभागृहात हशा पिकला.