आमदारांच्या हुकूमावरून एकाकडेच धुरळणी, बाकिच्यांना वाकुल्या, रहिवाशांचा संताप

0

जळगाव – शहरातील अस्वच्छतेमुळे होणार्‍या डासांच्या पैदासीमुळे शहरवासिय हैराण झालेले असताना आमदार सुरेश भोळे यांनी मात्र, केवळ आपल्याच कर्मचार्‍याच्या घरी धूरळणी यंत्र पाठवून इतरांना वाकुल्या दाखविण्याचे काम केले. या प्रकाराविषयी गुरुदत्त कॉलनीमधील माजी नगरसेविका जयश्री पाटील यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. जळगावात सगळीकडेच अस्वच्छते विषयी बोंब आहे. सत्ताधार्‍यांनी नाशिकच्या कंपनीला ठेका देऊनही काम होत नसल्याच्या असंख्य तक्रारी नागरिक करीत असतात. अस्वच्छता आणि तुंबणार्‍या गटारी यामुळे डासांची पैदासही भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. परंतु, डासांच्या समस्यांचे निराकरण करण्यातही कसा भेदभाव केला जातो? याचा अनुभव आज गणेश कॉलनी परिसरातील रहिवाशांनी घेतला.

भाजपाचे आमदार सुरेश भोळे यांच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारी मोहन नेवे यांचे निवासस्थान गुरुदत्त कॉलनीत आहे. आज सायंकाळी त्यांच्या घरी धुरळणीचे मशिन घेऊन एक कर्मचारी हजर झाला. त्याने नेवे यांच्या घरात शिरून धुरळणी केली. हा सर्व प्रकार आजूबाजूचे रहिवासी पाहात होते. धुरळणी झाल्यानंतर त्यांनी आमच्या घरातही धुरळणी करून द्या म्हणून संबंधित कर्मचार्‍याला सांगितले. त्यावर या कर्मचार्‍याने, आमदारांनी केवळ नेवे यांच्याकडे धुरळणी करण्यास मला सांगितले असल्याचे उत्तर दिले. ते ऐकून नागरिकांचा संताप झाला. नेवे यांच्या शेजारीच भाजपाच्या माजी नगरसेविका जयश्री नितीन पाटील यांचे घर आहे. त्यांनी या प्रकाराबाबत आ. सुरेश भोळे यांना संपर्क साधला. मात्र, प्रत्यक्ष संवाद होण्यासाठी त्यांना दीड ते दोन मिनिटे प्रतीक्षा करावी लागली. जयश्री पाटील यांनी एकाकडेच कशी धुरळणी करता, इतरांकडे का नाही? अशी विचारणा आ. भोळे यांना केली. त्यावर आमदारांनी मी असे सांगितले नाही. तुमच्या भागात उद्या धुरळणी करायला पाठवतो, असे सांगत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, आमदारांकडून झालेल्या भेदभावाची चर्चा रहिवाशांमध्ये चांगलीच रंगली होती.