आमदारांना पहा अन् बेलफुल वाहा

0

राष्ट्रवादीच्या अर्बन सेलचे उपहासात्मक आंदोलन

जळगाव – मी वारंवार सांगून देखील पाणीपुरवठा योजनेसह खोदलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांकडे अधिकारी दुर्लक्ष करतात. मनपाच्या दोन अधिकार्‍यांनी माझी आमदारकी संपविण्याची सुपारी घेतल्याचा आरोप जिल्हा विकास समन्वय व संनियत्रण समितीच्या सभेत भाजपा आमदार सुरेश भोळे यांनी केला होता. हाच धागा पकडत आज गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलकडून आमदारांच्या प्रतिमेला बेलफूल वाहण्याचे आंदोलन करण्यात आले. अधिकारी ऐकत नसतील तर या ‘आमदारांना पहा अन बेलफूल वाहा’ अश्या शब्दात या आंदोलनातून आमदारांची खिल्ली उडविण्यात आली.

जळगाव जिल्हा विकास समन्वय व संनियत्रण समितीच्या सभेत शहरातील नादुरुस्त रस्त्यावरुन आ. राजूमामा भोळे आक्रमक झाले होते. त्यांनी रस्त्यांच्या विषयावरून मनपा अधिकारी सुनिल भोळे व डि.एस. खडके यांनी माझी आमदारकी संपविण्याची सुपारी घेतल्याचा गौप्यस्फोट केला होता. आमदार भोळे यांच्या या विधानाचा राष्ट्रवादी अर्बनसेकडून आंदोलनाद्वारे समाचार घेण्यात आला. काव्या रत्नावली चौकात सेलच्या जिल्हाध्यक्ष आश्विनी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आमदार भोळेंच्या प्रतिमेला बेलफूल वाहण्याचे आंदोलन करण्यात आले. ‘पाच वर्षात मुख्यमंत्री त्यांचा, पालकमंत्री त्यांचा, मंत्री त्यांच्या पक्षाचा, महापौर व 57 नगरसेवकांचे बहुमत त्यांचे असतांना देखील आमदार भोळेंनी शहरातील कामे का मार्गी लावली नाही असा सवाल उपस्थित करून आमदारांनी राजीनामा देण्याची मागणी केली.

काव्यरत्नावली चौकात आंदोलन

आमदार केवळ बेलफुल वाहण्याच्या कामाचे बॅनर तसेच आमदार भोळेंच्या प्रतिमेला बेलफुल वाहून राष्ट्रवादी अर्बन सेलतर्फे अनोखे आंदोलन यावेळी करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका अश्विनी देशमूख, महानगराध्यक्ष ममता सोनवणे, उपाध्यक्ष लता पाटील, सरचिटणीस मंगल पाटील, सचिन सामी गोसावी, उपाध्यक्षा मनिषा देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.