आम्ही कलाकार खूप भाग्यवान आहोत

0

सुप्रसिध्द ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची प्रकट मुलाखत

पिंपरी – आम्ही कलाकार खूप भाग्यवान आहोत. आम्हाला वेगवेगळी पात्रं जगायला मिळतात. त्यांची सुख – दु:ख अनुभवता येतात. कलाकाराला आपल्या खासगी आयुष्यापेक्षा पात्राचे आयुष्य जवळचे वाटते. मला वाटते कलाकार म्हणून आम्ही दररोज नाविन्य शोधतो आणि दररोज नवी पात्र जगतो याचा आनंद आहे, असे मत सुप्रसिध्द ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले. कलारंग सांस्कृतिक कला संस्था, पिंपरी-चिंचवडच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी (दिनांक 22 जानेवारी) आयोजित एक तोचि नाना या खास कार्यक्रमात ते बोलत होते.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात प्रसिध्द मुलाखतकार व संवादक समीरन वाळवेकर यांनी प्रकट मुलाखत घेतली. या निमित्ताने नरेंद्र चुग (सामाजिक कार्यकर्ते), शारदा मुंडे, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ,लेखक सोपानराव खुडे,चित्रकार सुनील शेगावकर,लेखक जालिंदर कांबळे, अमृता ओंबळे (नाट्यअभिनेत्री) यांना पिंपरी-चिंचवड कलारंग पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी डॉ. डी.वाय .पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, राज्य लेखा समिती अध्यक्ष सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेविका अनुराधा गोरखे, अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा पिंपरी चिंचव़डचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे, मधुकर बाबर, उमा खापरे आदी उपस्थित होते.

नाटक सोडून चित्रपटात पदार्पणाची गोष्ट सांगताना नाना पुढे म्हणाले, प्रेक्षक म्हणून समोर बसलेल्या माणसांना जशा भावना असतात. तशा त्या कॅमे-याला नसतात. म्हणून, नाटकात काम करायला जास्त आवडायचं. हे सांगून स्मिता पाटील यांनी चित्रपटात आणल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तुम्ही अनेकांमधून खलनायक साकारला, असा प्रश्‍न विचारल्यानंतर नाना म्हणाले की, प्रत्येक माणसात एक खलनायक असतोच. पण सामान्य माणूस सगळ सहन करत राहतो. आपण व्यक्त होत नाही. हा आपला गुन्हा, असे मला वाटते. सोबतीला बलात्कारी, खुनी ही पात्रे स्विकारणे मनाला कधीच आवडले नाही. नाना यांनी सुरुवातीच्या काळात गुन्हेगारी भूमिका केल्या आहेत असा प्रश्‍न करत एक चित्रफीत दाखवण्यात आली. यानंतर जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी गुन्हेगारीवर बोलत असताना अनेक गोष्टींचा उलगडा केला. नाना म्हणाले की, गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे मामा. त्यांची मुलंही तशी होती. त्यांच्यापासून लांब राहावं म्हणून आई मुरुडला गावी घेऊन गेली, असं ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांना तुम्ही प्रत्यक्षात मोठ्या गुन्हेगाराला बघितलंय किंवा भेटलात का? असा सवाल करण्यात आला. यावर मन्या सुर्वे असं त्यांनी उत्तर दिलं. मन्या सुर्वे हा माझा भाऊ आहे. माझ्या मामाचा तो मुलगा असं नाना पाटेकर यावेळी म्हणाले.


विक्रम गोखले सारखा मी देखणा नट नाही. माझा आहे हा चेहरा विसरत असाल तर मी बॅरिस्टर नाटक करायला तयार आहे. माझी खूप दिवसांपासूनची इच्छा आहे बॅरिस्टर नाटक करण्याची ही त्यांनी बोलून दाखवली. कमीत कमी या नाटकाचे 25 प्रयोग करायला आवडतील. पुढे ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांच्या तालमीत तयार झालो. त्यांच्यामुळे मला कलाकार म्हणून दृष्टी मिळाली, असे नानांनी अभिमानाने सांगितले. तुम्ही कोणत्या पक्षात आहात, त्यावरुन तुमची विचारसरणी ठरते. सगळ्याच पक्षात चांगल्या गोष्टी असतात. पण तुम्ही कशाची पायमल्ली करता कशाची अंमलबजावणी त्यावर सगळे ठरते. शेतक-यांच्या विषयावरून नाना पाटेकर यांनी शेतकर्‍यांना भावनिक पाठिंबा आणि प्रोत्साहन देणं गरजेचं असल्याचं सांगितलं. राजकीय नेत्यांनी शेतकर्‍यांना पैसे नाही दिले तरी चालतील. त्यांना फक्त कर्जमाफी नाही तर भावनिक पाठिंबा आणि प्रोत्साहनाची गरज असते. आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे, शेतकरी काही भिकारी नाहीत, असं परखड मत नाना पाटेकर यांनी मांडलं. कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी प्रास्ताविक केले. भाऊसाहेब कोकाटे यांनी सुत्रसंचालन केले.

शरद पवार माझे हिरो
ज्येष्ठ नेते शरद पवार माझे हिरो आहेत. शरद पवार राजकारणातले चाणक्य आहेत. मला वाटायच की चंद्रगुप्त त्यांनी कोणाला बनवल नाही. पण, नंतर समजले की, तेच चंद्रगुप्त आणि तेच चाणक्य आहेत. पवारांसारखा माणूस मी पाहिला नाही. त्यांनी कॅन्सरला देखील पळवले आहे. ते मला खूप आवडतात, असे नाना पवारांविषयी बोलताना म्हणाले. तर, नंतर उद्धव, शरद पवार, देवेंद्र, सगळेच माझे आहेत. त्यामुळे मला सगळेच जवळचे वाटतात. राजकारणात मला जायला आवडणार नाही. कारण माझा तो पिंड नाही, असेही नाना म्हणाले.

पिंपरी-चिंचवड शहरासोबत जुने ऋणाबंध
कलारंग संस्थेच्या माध्यमातून अमित गोरखे यांनी प्रयत्नातून मुलाखतीच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड रसिक प्रेक्षकांसमोर येण्याचे भाग्य लाभले. परंतु, माजी महापौर आझम पानसरे यांचे वडील फकीरभाई पानसरे यांच्यासोबतची त्यांच्या बांधकामावर मुकादम म्हणून काम केल्याची आठवण सांगून पिंपरी-चिंचवड शहरासोबत जुने ऋणाबंध असल्याचे नानांनी यावेळी सांगितले.