आम्ही हे सरकार पाडणार नाही: चंद्रकांत पाटील

0

मुंबई: काल भाजपची राज्यस्तरीय परिषद झाली. या परिषदेला देशभरातील नेत्यांसह राज्यातील भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. राज्यस्तरीय परिषदेत भाजपने महाविकास आघडीच्या सरकारसह शिवसेनेवर हल्लाबोल केला. हे सरकार अनैसर्गिकरित्या सत्तेत आले असून अधिक काळ टिकणार नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान आज सोमवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे सरकार अधिक काळ टिकणार नाही हे खरे असले तरी आम्ही हे सरकार पाडणार नसल्याचे वक्तव्य केले आहे. विरोधी पक्षात बसण्याच्या जनादेश असणारे सत्तेत आले आहे, जनतेने संपूर्ण प्रकार पाहिलेला आहे. जनता त्यांना माफ करणार नाही असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मुंबईत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजपकडून दररोज हे सरकार अधिक काळ टिकणार नसल्याचे वक्तव्य केले जात आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जळगाव येथे हे सरकार पाडून दाखवाच असे थेट आव्हान भाजपला दिले होते. त्यावर काल झालेल्या भाजपच्या परिषदेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक घ्या असे आव्हान शिवसेनेला दिले.

राज्यात ४०० ठिकाणी आंदोलन

यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपने राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. २५ फेब्रुवारीपासून भाजप आंदोलन करणार आहे. राज्यात ४०० ठिकाणी एकाच वेळी आंदोलन होणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे.

इंदोरीकर यांचे समर्थन नाही

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या वक्तव्याने राजकारण तापले आहे. भाजप इंदुरीकर महाराज यांच्या पाठीशी असल्याचे बोलले जात आहे. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप इंदुरीकर यांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही मात्र इंदुरीकर यांच्या पाठीशी आहोत असे सांगितले. एका वक्तव्याने ती व्यक्ती वाईट होत नाही असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.