आम आदमी पार्टी लढवणार मुंबई मनपा निवडणूक !

0

मुंबई: दिल्लीत सलग तीन वेळेस विजय प्राप्त केल्यानंतर आम आदमी पार्टी मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आपला मुंबईत कसा प्रतिसाद मिळतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. दिल्लीच्या विजयानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात पक्षाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत केजरीवाल सरकारने काम केलं. त्यामुळे दिल्लीकरांनी सत्ता दिली. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील इतर महापालिका निवडणुकाही लढवण्यावर आमचा भर असेल, असं आपचे खासदार संजय सिंह यांनी सांगितले.

आम आदमी पार्टी एक पर्याय म्हणून उभा राहत आहे. हा पर्याय स्वीकारायचा की नाही हे आता जनतेनेच ठरवायचे आहे. राष्ट्र निर्मितीच्या कार्यात आपशी जनतेने संलग्न व्हावं म्हणून एक अभियान सुरू करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने ५ दिवसांत १३ लाख लोकांना पक्ष सदस्य केलं जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

दिल्लीत आम्ही १०० यूनिट वीज मोफत दिली. दिल्ली सरकारने ही किमया कशी साधली याचा सल्ला ठाकरे सरकारने विचारल्यास आम्ही त्यांना सल्ला देऊ. त्यांना मदत करायला आम्ही तयार आहोत, असं ते म्हणाले. राज्य जेवढं मोठं असतं तेवढी त्या राज्याकडे साधनसामुग्री अधिक असते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला खरोखरच जनतेला मोफत वीज द्यायची असेल तर शक्य आहे, असंही ते म्हणाले.