आरोपीच्या शोधार्थ पोलीस बनले घरकुल योजनेचे अधिकारी तर कधी फायनान्सचे कर्मचारी

0

शिक्षा न भोगता फरार संशयिताला सात वर्षानंतर एलसीबीकडून अटक ; विविध जिल्ह्यासह राज्यात राहत होता नाव बदलावून

जळगाव – चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हयात न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेविरोधात औरंगाबाद खंडपीठात अपिल केले. खंडपीठाने शिक्षा कायम केल्यानंतर उर्वरीत शिक्षा न भोगता आरोपी अन्वरशहा बाबुशहा फकीर रा. लोंजे ता.चाळीसगाव हा फरार झाला होता. या संशयिताने विविध ठिकाणी नावे व पत्ता बदलावून वास्तव्य करुन शोधार्थ असलेल्या स्थानिक पोलिसांसह जिल्हा पोलीस यंत्रणेला हैराण करुन सोडले होते. तब्बल सात वर्षानतर डोकेदुखी ठरलेल्या फरार अन्वरशहा याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. महिनाभर मध्यप्रदेशसह विविध जिल्ह्यात शोधार्थ भटकणार्‍या पथकाला अन्वरशहाच्या अटकेतसाठी कधी घरकुल योजनेच अधिकारी तर कधी फायनान्सचे कर्मचारी बनावे लागल्याची माहिती मिळाली आहे. महिनाभराच्या परिश्रमाअंती आरोपीच्या मुसक्य आवळणार्‍या या पथकाचे पोलीस अधीक्षकांकडून कौतुक करण्यात आले आहे.

खंडपीठासह विशेष पोलीस महानिरिक्षकांचे होते आदेश
आरोपी अन्वरशहा बाबुशहा फकीर यास जिल्हा न्यायालयाने चाळीसगाव पोलीस स्टेशनला दाखल न. कोर्टाने 238/1998 भादवि.क.302,307,326 अन्वये गुन्ह्यात दोषी धरुन 1 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेवर अन्वरशहा याने औरंगाबाद खंडपीठात अपिल दाखल केले होेते. यावर खंडपीठाने
अन्वरशहा बाबुशहा फकीर याची शिक्षा कायम ठेवली होती. शिक्षा कायम ठेवल्याच्या आदेशानंतर फकीर शहा फरार झाला होता. जिल्हा न्यायालयाने त्याचे वॉरंट काढले होते. तर खंडपीठाने त्याच्या अटकेसाठी विशेष पोलीस महानिरिक्षकांना पत्रव्यवहार करुन आदेश दिले होते. त्यानुसार विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरींग दोरजे यांनी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना सुचना व आदेश दिले होते.

संशयिताच्या शोधार्थ पथकाने लढविल्या शकली
पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी अन्वरशहा यांच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम, सहायक पोलीस निरीक्षक राजेश शिंदे, पोहेकॉ.जितेंद्र पाटील,अनिल देशमुख , विनोद पाटील, प्रविण हिवराळे या विशेष पथकाला नियुक्त केले होते. या पथकाने मध्यप्रदेश राज्यातील नरसिंगपूर येथे जावून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळत नसल्याने कर्मचार्‍यांनी फायनान्सचे कर्मचारी असल्याचे सांगितल्यावर अन्वरशहाबद्दल माहिती मिळाली होती. मात्र याठिकाणी तो मिळाला नाही. यानंतर सिल्लोड तालुक्यताील आमढाणे येथे पथक रवाना झाले. याठिकाणी माहिती मिळावी म्हणून पथकाला घरकुल योजनेचे कर्मचारी असल्याची शक्कल लढवावी लागली. मात्र यानंतरही पथकाला रिकामे हाते परतावे लागले. पथकाने महिनाभरात मध्यप्रदेशसह विविध जिल्ह्यात वार्‍या केल्या.

अंत्ययात्रेला आला अन् अडकला पथकाच्या जाळ्यात
अन्वरशहा वेळावेळी ठिकाणी वास्तव्य करतांना नाव, व पत्ता बदलावून राहत होता. शोध लागू नये म्हणून त्याने आधारकार्डही काढले नव्हते. तब्बल महिनाभराच्या अथक परिश्रमानंतर पथकाला 9 जानेवारी रोजी अन्वरशहा जळगावातील त्याच्या नातेवाईकाच्या अंत्ययात्रेला आला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पथकाने घटनास्थळ गाठले अन् सापळा रचून अन्वरशहाला अटक केली. सात वर्षापासून शोध लागत नसल्याने डोकेदुखी ठरलेल्या अन्वरशहाच्या अटकेनंतर पेालीस अधीक्षकांसह अधिकारी, कर्मचार्‍यांनी निश्‍वाःस सोडला. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी आपल्या दालनात बोलावून अन्वरशहाला अटक करणार्‍या पथकाचे विशेष कौतुक केले.