आर. आर. विद्यालयाच्या शिक्षकाला दुचाकी अडवून तरुणांकडून बेदम मारहाण

0

विसनजीनगरातील घटना ः तोंडाल रुमाल बांधलेला होता तरुण

जळगाव- शहरातील आर.आर. विद्यालयातील शिक्षक गिरीश रमणलाल भावसार (वय 45 रा. निवृत्तीनगर) यांना विसजनीनगरात दोन तरुणांनी दुचाकी अडवून हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी 12 वाजता घडली. फायटरच्या मारहाणीत भावसार यांचे नाकाचे हाड मोडले आहे. गेल्या महिन्यात आर.आर.च्या प्रवेशाव्दारजवळ तेथीलच शिक्षकाला मारहाणीची घटना ताजी असताना दुसर्‍या घटनेमुळे शिक्षकांमध्ये भितीचे वातावरण आहे. खोटेनगर परिसरातील निवृत्तीनगरातील रहिवासी गिरीश भावसार हे आर.आर.विद्यालयात माध्यमिकचे शिक्षक असून आठवी व दहावीच्या वर्गाला समाजशास्त्र विषय शिकवितात. नेहमीप्रमाणे गुरुवारी ते विद्यालयात आले. दुपारी शाळा सुटल्यानंतर ते आर.आर.विद्यालयातून घरी जाण्यासाठी निघाले.

दबा धरुन बसलेले होते तरुण
प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार आर. आर. विद्यालयाकडून जुन्या इंडोअमेरीकन हॉस्पिटलकडून जात असलेल्या रस्त्यावर महेश भोळे फुल भांडारजवळ मंदिरापाठीमागील बाजूस झाडाजवळ उभे होते. भावसार सरांची दुचाक दिसताच काही अंतरापर्यत पाठलाग करत एका तरुणाने डावा हात धरला. व त्याच्या तोंडावर फायटर घातलेल्या हाताला मारहाण केली. यात दुचाकीवरुन तोल जावून भावसार खाली पडले. नागरिकांनी धाव घेवून त्याला उचचले व रक्तबंबाळ झालेल्या भावसार यांना एका बाजूला बसविले. पोलिसांना प्रकाराची माहिती दिली.

नाकाचे हाड मोडले
मारहाणीनंतर घटनास्थळी एकच गर्दी झाली होती. प्रकाराची माहिती मिळताच आर.आर.विद्यालयाचे शिक्षक एन.एल.सपकाळे, एन.आर.कुमावत, आर.एम.झंवर, के.टी.वाघ, आर.बी.महाजन,एल.जी.भारुडे, के.जी.सोनवणे यांनी घटनास्थही धाव घेतली. व भावसार यांना प्रारंभी जिल्हापेठ व यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविले. मारहाणीत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून नाकाचे हाड मोडले आहे. नाकातून रक्तश्राव थांबत नसल्याने शिक्षकांनी त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला होता.

महिनाभरापूर्वीही एका शिक्षकाला मारहाण
गेल्या महिन्यात आर.आर.विद्यालयाचे शिक्षक किर्तीकुमार शेलकर (वय 38) यांना विद्यालयाच्या प्रवेशव्दाराजवळच भरदिवसा दोन तरुणांनी बेदम मारहाण केली होती. त्याच गुरुवारी भावसार सरांना मारहाण झाल्याने संस्था व शिक्षकांच्या जुन्या वादातून किंवा विद्यार्थ्यासोबतच्या पूर्ववैमनस्यातून तर मारहाण झाली नाही ना? अशी दबक्या आवाजात चर्चा असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे.