आशा भोसले पुरस्कार प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड यांना जाहीर

0
पिंपरी- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे सिद्धी विनायक ग्रुप पुरस्कृत भारतीय संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारा संगीतकार आणि गायकास प्रसिद्ध गायिक आशा भोसले यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा १७ वा आशा भोसले पुरस्कार प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड यांना जाहिर झाला आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यंदाचा हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम शनिवार दि. ९ मार्चला  संध्याकाळी ५.३० वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात होणार आहे. यावेळी पुस्काराचे वितरण राष्ट्रवादीचे  राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार असून, जेष्ठ संगीतकार पं.ह्रदयनाथ मंगेशकर, महापौर राहूल जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेता दत्ता  साने आदी उपस्थित राहणार आहे.
नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे  २००२ पासून स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या नावे आशा भोसले पुरस्कार दिला जातो. देश पातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकार आणि गायकास आशाजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा पुरस्कार दिला जातो.  भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘‘पुरस्काराचे यंदाचे सतरावे वर्ष असून हा पुरस्कार स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रविंद्र जैन, बाप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, गायक अनु मलिक, शंकर महादेवन, शास्त्रीय गायक पंडित शिवकुमारशर्मा , सुरेश वाडकर, हरीहरन व सोनू निगम, सुनिधी चौव्हाण, पार्श्वगायक पद्म भूषण उदित नारायण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.  सतरावा  पुरस्कार सुप्रसिध्द गायक रूपकुमार  राठोड यांना जाहीर करताना परिषदेला आनंद होत आहे. १ लाख ११ हजार रुपये रोख, शाल व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच संगीत विषयक अभिरूची रूपकुमार यांना असून राठोड यांनी हिंदी, मराठी, उर्दू अशा तेरा भाषांमध्ये गाणी गायली असून त्यांचे १७ अल्बम प्रसिद्ध झाले आहे. संगीतकार आणि गझल गायक म्हणूनही त्यांचा लौकीक आहे. १९९७ मध्ये बॉर्डर चित्रपटातील ‘संदेसे आते है….’ देशभक्तीपर गीत तरूणाईच्या ओठावर होती. तसेच तेरे नाम, तेजाब, मदहोशी, जहर, नजर, धूमधडाका, लाईफ एक्सप्रेस आणि मराठी चित्रपट गुलमोहरलाही संगीत दिले आहे.  यावेळी रूपकुमार राठोड यांच्या  गीतांवर आधारित मधुमित निर्मित मधुसूदन ओझा प्रस्तुत रजनीगंधा  हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामुल्य सादर होईल.