आ. डॉ. सतीश पाटलांचे ना.महाजन यांना आव्हान

0

पुन्हा निवडून न आल्यास भास्करआप्पांचे नाव लावणार नाही

जळगाव – जिल्हा नियोजन समितीच्या सभेत आज ‘पुन्हा निवडून येईन तेही मोठ्या मताधिक्क्यानेे नाहीतर भास्करआप्पांचे नाव सांगणार नाही’, असे आव्हान आ. डॉ. सतीश पाटील यांनी पालकमंत्री गिरीष महाजन यांना दिले. निवडणूक मात्र, बॅलेट पेपरवर घ्या असेही ते सांगण्यास विसरले नाही.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री ना. गिरीष महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत निवडून येण्याच्या मुद्यावरून एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान दिले. जिल्हा नियोजन समितीची सभा राजकीय आखाडाच झाल्याचे चित्र दिसून आले. पालकमंत्री ना. गिरीष महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. सतीश पाटील यांच्यातील शाब्दीक वादामुळे ही बैठक गाजली. बैठक सुरू असताना गिरीश महाजनांनी डॉ. सतीश पाटलांना उद्देशून ‘त्यांची शेवटची बैठक आहे’, असा चिमटा काढल्याने ठिणगी पडली. त्यावर आमदार डॉ. सतीश पाटलांनी आक्रमक पवित्रा घेत ‘मी आगामी विधानसभा निवडणुकीत तुमच्यापेक्षा जास्त मतांनी निवडून येऊन पुन्हा याच सभागृहात बसेल’, असे प्रत्युत्तर दिले. महाजनांनी ‘पहा बरं’ असे सांगताच डॉ. सतीश पाटील अधिक आक्रमक झाले.
हे नाना पटोलेंचे आव्हान नाही
‘मागच्या निवडणुकीत मोदी लाट असताना मी खान्देशातून एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार म्हणून निवडून आलो. आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील मी निवडून येईल. तुमच्यात हिंमत असेल तर निवडणूक ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. हे आव्हान डॉ. सतीश पाटील देतोय, नाना पटोलेंचे हे आव्हान नाही, असा चिमटादेखील आमदार डॉ. पाटील यांनी महाजनांना काढला. लोकसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात विकासकामे झाली नाहीत. त्यामुळे विविध योजनांचा कोट्यवधी रुपयांचा निधी अखर्चित राहिला. आता नियोजन करण्याऐवजी बैठकीत वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप करत डॉ.सतीश पाटील हे बैठक सोडून बाहेर पडले.
त्यांनी निवडून येऊन दाखवावे – ना. महाजन
आ. डॉ. सतीश पाटील यांच्या आव्हानाबाबत बोलतांना पालकमंत्री महाजन यांनी सांगीतले की, बैठक सुरू असताना मी केवळ गंमतीत डॉ. सतीश पाटलांना ‘त्यांची शेवटची बैठक आहे’, असे म्हटलो. पण त्यांनी ते मनावर घेतले. निवडून आलो नाही तर बापाचे नाव लावणार नाही, एवढ्या टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती तरीही त्यांनी दिलेले आव्हान मी स्वीकारले आहे. आगामी विधानसभा निवडणूक ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी त्यांनी करावी. हवे तर आम्ही मतदारांचे हात उंचावून मतदान घ्यायला तयार आहोत. त्यांनी निवडून येऊन दाखवावेच, अशी प्रतिक्रिया गिरीष महाजन यांनी बैठकीतील वादाविषयी दिली आहे.