आ. स्मिता वाघ म्हणाल्या, मी निष्क्रिय राहणार नाही

0

जळगाव – पक्षाने महिला म्हणून प्रथमच जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची संधी दिली असून निष्क्रीय खासदार म्हणून निवडून दिल्याची जाणीव होऊ देणार नसल्याची ग्वाही भाजपाच्या उमेदवार आ. स्मिता वाघ यांनी आज येथे दिली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आपले उमेदवार असल्याचे समजून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन महानगर जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी भाजपा कार्यालयात झालेल्या कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकार्‍यांनी बैठकीत केले.
भाजपा कार्यालयात महानगर जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करतांना आ. राजूमामा भोळे पुढे म्हणाले की, जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात पक्षाने उमेदवार जाहीर केलेले असले तरीही नरेंद्र मोंदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे. शहरात 9 हजार पन्ना प्रमुखांचे संमेलन घेतले जाणार असून, या संमेलनाला ज्येष्ठ नेते, मंत्री मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक प्रभागात एका नगरसेवकाकडे जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांनी समन्वय ठेवून काम करावे. माझ्याविरुध्द नाराजी असेल तर ती काही काळापुरती बाजूला ठेवून भाजपाचे उमेदवार निवडून आणावेत, असे सांगितले. दरम्यान आ. स्मिता वाघ यांना जळगाव शहरातून एक लाखाचे मताधिक्य मिळवून देणार असल्याचेही आ. भोळे यांनी सांगितले.