इंदापुरात काँग्रेस-राष्ट्रवादीची युती होण्याची शक्यता धूसर

0

भरणे-पाटील आमनेसामने

इंदापूर : सुधाकर बोराटे

2019 ची लोकसभा व विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे इंदापूर तालुक्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापू लागले आहे. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची युती होणार असल्याची चर्चा आहे. परंतु इंदापूर तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची युती होण्याची शक्यता धूसर आहे. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्यातच विधानसभेची खरी लढत होणार असल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे.
राजकिय शह-काटशह व आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय कुरघोड्या करण्याची एकही संधी दोघांकडूनही सूटत नसल्याने विधानसभा निवडणूक चांगलीच गाजणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचे इंदापूर तालुक्यात अनेकवेळा दौरे झाले. त्यांनी तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून चांगली कामे केलेली आहेत. त्यांच्या दौर्‍याची चर्चाही रंगत आहे. गेल्या एक दोन महिन्याच्या कालावधीमधील आजी-माजी आमदारांचे तालुक्यातील कार्यक्रम, दौरे, विविध विकासकामांची भूमिपूजने, उद्घाटने, श्रेयासाठी एकमेकांवर केलेले कुरघोडीचे राजकीय कार्यक्रम व जाहीर सभा या सर्वांचे बारकाईने अवलोकन केले तर तालुक्यात चर्चा लोकसभेची होताना दिसत आहे.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जोमात

चालू वर्षामध्ये इंदापूर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना राजकीय शह देण्यासाठी अंथुर्णे येथे राष्ट्रवादीचा मोठा महामेळावा घेऊन मोठी ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला होता. हर्षवर्धन पाटलांनी अंथुर्णे गावात सभा घेऊनच दाखवावी, असे खुले आव्हान दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांना दिले होते. पाटीलांनीही हे आव्हान स्विकारून अंथुर्णेत सभा घेऊन काँग्रेसची ताकद दाखवून दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाच वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात इंदापुरातील शरदकृषि महोत्सवाला हजेरी लावत सर्वांनाच बुचकळ्यात टाकले होते. कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देत अडचणी आल्यास त्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी जाहीर सभेत दिले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसुद्धा तालुक्यात अनेकवेळा दौरे झाले आहेत.

हर्षवर्धन पाटील यांचे शक्तीप्रदर्शन

काँग्रेस रॅलीच्या माध्यमातून राज्यातील काँग्रेसची मातब्बर मंडळी इंदापूरला आली होती. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांचा समावेश होता. त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीला आपली ताकद दाखवून दत्तात्रय भरणे यांना शह देण्याचा प्रयत्न केला होता. पृथ्वीराज चव्हाण यांनी मागील आठवड्यात पुन्हा इंदापूर दौरा केला. त्यावेळी त्यांनी इंदापूरची जागा राष्ट्रवादीने गृहीत धरू नये, असे जाहीर केले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

चर्चा लोकसभेची, रणधुमाळी विधासभेची

काँग्रेस, राष्ट्रवादी सोडल्यास इंदापूर तालुक्यात इतर पक्षांची ताकद बोटांवर मोजण्या इतकीच आहे. त्यामुळे खरी लढत ही हर्षवर्धन पाटील व दत्तात्रय भरणे यांच्यातच होण्याची दाट शक्यता आहे. या आठवड्यात दोन्ही पक्षांच्या वतीने तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटने, जाहीर सभा अशा भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल होती. तालुक्यात चर्चा लोकसभेची, तर प्रचार व रणधुमाळी विधासभेची सुरू असल्याचे दिसून येत आहे.