इराणची चीनशी जवळीक, भारताला धका; रेल्वे प्रकल्पातून भारताला हटविले

0

तेहरान: इराणमधील चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला इराणने हटवले आहे. या रेल्वे प्रकल्पासाठी भारताकडून निधी येणार होता. मात्र, कराराच्या चार वर्षानंतरही हा निधी न आल्यामुळे इराणने भारताला यातून हटवले आहे. हा प्रकल्प स्वत: पूर्ण करणार असल्याचे इराणकडून सांगण्यात आले आहे. इराणच्या या निर्णयामुळे भारताला धक्का बसला आहे. हा प्रकल्प भारतीय रेल्वेच्या अखत्यारीतील कंपनी पूर्ण करणार होती. हा प्रकल्पामुळे भारताला अफगाणिस्तान आणि अन्य मध्य आशियाई देशांसाठी एक पर्यायी मार्ग देता येणार होता. या प्रकल्पासाठी भारत, इराण आणि अफगाणिस्तानमध्ये करार झाला होता.

चाबहार रेल्वे प्रकल्पानुसार, चाबहार बंदरापासून जहेदानपर्यंत रेल्वे मार्ग सुरू करण्यात येणार होता. मागील आठवड्यात इराणचे परिवहन आणि शहर विकास मंत्री मोहम्मद इस्लामी यांनी रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले होते. या रेल्वे मार्ग अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत जाणार आहे. हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये इराणचा दौरा केला होता. त्यावेळी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या संपूर्ण प्रकल्पासाठी १.६ अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित होती.

चीन आणि इराणमध्ये ४०० अब्ज डॉलरचा महाकरार होणार असल्याची चर्चा आहे. या करारानुसार चीन इराणकडून अतिशय स्वस्त दरात तेल खरेदी करणार आहे. इराण अत्याधुनिक शस्त्रेदेखील देणार आहे. इराण आणि चीनममध्ये २५ वर्षासाठी रणनितीक करार होणार आहे.