इस्लामिक दहशतवादाविरोधात भारत-अमेरिकेची भागिदारी !

0

दहशतवादाला धर्म असतो का? या विषयावर भारतात सातत्याने चर्चा व वाद विवाद होत असतात. मात्र ही समस्या कशी सोडवता येईल? यापेक्षा वाद वाढवून स्वत:चे महत्त्व कसे वाढवून घेता येईल, यासाठी वाचाळवीर राजकारणी, ढोंगी पुरोगामी, स्वयंघोषित मानवधिकार कार्यकर्ते समाजात अशांतता निर्माण करण्याचे काम इमानेइतबारे करतात, असा आजवरचा अनुभव आहे. भारतात जेंव्हा इस्लामिक दहशतवादाची चर्चा सुरु होते तेंव्हा हे हिंदूत्त्ववादी संघटनांनी रचलेले षडयंत्र असल्याचा कांगावा केला जातो मात्र आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचा उल्लेख करत कट्टर इस्लामिक दहशतवादापासून रक्षण भारत व अमेरिका करण्यास कटिबद्ध आहे, असे नमुद करत यावर शिक्कामोर्तब केले आहे. अहमदाबादमधील मोटेरा स्डेडियममध्ये पार पडलेल्या ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमात ट्रम्प इस्लामिक दहशतवादावर भाष्य केल्याने इस्लामिक दहशतवादाची चर्चा पुन्हा एकदा नव्याने सुरु होणे स्वाभाविक आहे.

आज जगामध्ये 193 देश आहेत. यापैकी 100 हून अधिक देशांना दहशतवादाचा धोका आहे. जगभरात फार कमी राष्ट्रे आहेत, ज्यांना या दहशतवादाची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष झळ बसलेली नाही. आज अमेरिका दहशतवादाविरोधात आदळआपट करत असता तरी कुठेतरी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या दहशतवाद फोफावण्यास अमेरिकाच कारणीभुत आहे. दहशतवादाचे बीज तेलाच्या खाणींवरील मालकीहक्कांच्या अवतीभोवती सापडते. तेलासाठी अमेरिकेने मध्यपूर्वेतील देशांमध्ये दहशतवादाचे बीज पेरले. तुम्ही आम्हाला तेलाच्या मोबदल्यात शस्त्रे असा बाजार अमेरिकेने गेल्या अनेक वर्षांपासून मांडला आहे. अफगाणिस्तान असो, इराक, इराण या देशांना अधिकाधिक अत्याधुनिक शस्त्रे पुरवून आपल्याला डोईजड होणार्‍या देशांत दहशत पसरवणे ही अमेरिकेची नीती राहिलेली आहे. रशिया व अमेरिकेच्या शीतयुद्धात अफगाणिस्तानला मोठ्या प्रमाणात शस्त्रकुमक, आर्थिक रसद अमेरिकेकडून पुरवण्यात आलेली होती. येथेच अल-कायदा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा जन्म झाला. या अल-कायदाने अमेरिकेवर हल्ला केल्याचे इतीहास सांगतो.

अमेरिकेतल्या 9/11 हल्ल्यानंतर ‘इस्लामी दहशतवाद’ या शब्दाचा जन्म झाला. अल कायदासह इसिस या कुख्यात दहशतवादी संघटनेच्या उदयानंतर जगाने अत्यंत भयानक असे दहशतवादी हल्ले पाहिले आणि त्याला इस्लामी दहशतवादाचे नाव देण्यात आले. इसिस अर्थात ‘इस्लामिक स्टेट’ ही सर्वांत महत्त्वाची आणि मोठी दहशतवादी संघटना आहे. साधारणपणे 2014 नंतर ही संघटना पुढे आली आणि आज ती जगातील सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना बनली आहे. याला धार्मिक स्वरुप मिळण्यामागे मोठा इतीहास आहे. अफगाणिस्तानमध्ये 1996 ते 2001 या काळामध्ये तालिबानची राजवट होती. अफगाणिस्तानमध्ये वांशिक गटांमध्ये असणार्‍या संघर्षाचा फायदा तालिबानने घेतला. साधारण 2010पर्यंत तालिबान पुरस्कृत दहशतवाद ठिकठिकाणी दिसून येत होता. परंतु 2011 मध्ये ‘अरब स्प्रिंग’ नावाने आखातामध्ये लोकशाही चळवळी सुरू झाल्या. परंतु पुढे या चळवळींचे रुपांतर वांशिक संघर्षामध्ये झाले. हा संघर्ष प्रामुख्याने शिया आणि सुन्नी यांच्यामध्ये होता. या वांशिक संघर्षातून काही दहशतवादी संघटना पुढे आल्या. दुसर्‍या बाजूला तेलाच्या राजकारणासाठी अमेरिकेने इराकवर बळजबरीने युद्ध लादले. अमेरिकी सैन्यासमोर सद्दाम हुसेन यांच्या इराकी सैन्याचा निभाव काही लागला नाही. पण याच इराक सैन्यदलातील अधिकारतयांनी मध्यपूर्वेतील सीरियातील युद्धखोरांना धर्माच्या नावावर जिहाद पुकारायला लावला. त्यातूनच मग इसिसची निर्मिती झाली. इसिसचे भूत आता जगातील प्रगत, अप्रगत देशांना आपल्या कारवायांमुळे घाबरवून सोडत आहे.

इसिस किंवा अल कायदासारख्या संघटनांचा उदय हा पाकिस्तानच्या मदरश्यांमध्ये दिल्या जाणार्‍या विशिष्ट प्रकारच्या शिकवणूकीतून झाला. पाकिस्तानी मदरशांमधून इस्लामच्या नावाखाली विकृत शिकवण देऊन मुस्लिम तरुणांच्या मनात विष पेरण्यात आले. काफीर, जिहाद सारखे शब्द त्यांच्या मनावर एवढे बिंबवण्यात आले की त्यातून मोठ्या प्रमाणात हिंसेला सुरुवात झाली. याची किंमत आज पाकिस्तान देखील मोजत आहे. या देशांमध्ये एखादा बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी हल्ला इस्लामिक स्टेटकडून घडवून आणला जातो, तर त्याचे प्रत्युत्तर अल-कायदाद्वारे तसाच किंवा त्याहून भीषण हल्ला घडवून आणून दिले जाते. असेच चित्र अफगाणिस्तान, बांगलादेशात, इराक सिरियात सुध्दा दिसते. याची झळ भारताला बसते. गेल्या काही वर्षात शेजारच्या देशांमध्ये फोफावणार्‍या दहशतवादाची मोठी किंमत भारताला मोजावी लागली आहे. म्हणूनच ट्रम्प यांचे विधान महत्त्वपूर्ण ठरते. भारत-अमेरिकेने दहशतवादाची झळ सोसली असल्याचे सांगत इराक-सीरियातील दहशतवादी संघटना आम्ही पूर्णत: नष्ट केल्या. इसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादीला संपविले. पाकिस्तानलाही दहशतवादी संघटनांविरुद्ध कारवाई करावी लागेल. भारत-अमेरिका दहशतवादाविरुद्ध लढण्यास कटिबद्ध आहे. ही लढाई एकत्रपणे लढावी लागेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केल्याने दहशतवादाविरोध गेली अनेक वर्ष लढा देणार्‍या भारताच्या कृतीचे अमेरिकेने एकाप्रकारे समर्थनच केले आहे.

अमेरिकेसारखा बलाढ्या व सर्वशक्तीशाली देशही गेल्या काही वर्षापासून दहशतवादाचा सामना करीत आहे. अमेरिकेसह युरोपीय देशांना इस्लामी दहशतवाद भेडसावतो आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेशातही वेगवेगळ्या प्रकारे दहशतवाद फोफावतो आहे. त्यामुळेच या दहशतवादाचा सामना करणे हे एका राष्ट्रापुरते मर्यादित राहिलेले नाही. परिणामी, या दहशतवादाचा सामना करण्यासाठी बहुराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करणे हे अपरिहार्य बनले आहे. आतापर्यंत अमेरिकाच दहशतवाद फोफावण्यास पुरक भुमिका घेत असला तरी आता ट्रम्प यांनी दहशतवादाविरोधात कडक धोरण स्विकारले आहे, ‘देर आये दुरुस्त आये’ म्हणत अमेरिकेच्या या भुमिकेचे स्वागतच करायला हवे.