‘उद्धवजी पुन्हा परत फिरा’; मुनगंटीवारांची उद्धव ठाकरेंना साद !

0

मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. सरकार स्थापन होण्यापूर्वीचे राजकारण संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने एकत्र लढली होती. मात्र मुख्यमंत्री पदावरून बिनसल्याने शिवसेनेने राष्ट्रवादी-कॉंग्रेसशी हातमिळवणी करून मुख्यमंत्री पद मिळविले आणि पर्यायाने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. एकत्र निवडणूक लढविल्यानंतर भाजपशी फारकत घेण्याचा शिवसेनेने जो निर्णय घेतला, त्यामुळे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खूप टीका झाली. दरम्यान शिवसेना पुन्हा भाजपसोबत येईल असा विश्वास भाजपच्या नेत्यांना आहे.

माजी अर्थमंत्री भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार पुन्हा शिवसेनेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साद घातली आहे. ‘कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या चकव्यात येऊ नका, तुम्हाला ही मंडळी तुमच्या मनानुसार काम करू देणार नाही. तुमचे विचार आणि भाजपचे विचार एकच असल्याने उद्धवजी पुन्हा परत फिरा अशी साद सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांनी घातले.

अधिवेशन सुरु असून यावेळी सभागृहात कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक पुढे ढकलण्यासंदर्भात बिल मांडण्यात आले. याला भाजपने विरोध केला. यावेळी सुधीर मुनगंटीवार बोलत होते. राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे नेते संचालक मंडळावर कायम राहण्यासाठी हा बिल आणू पाहत असल्याचे आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केले.