उद्धव ठाकरे सरकार तरले, १६९ आमदारांचा पाठींबा

0

मुंबई: २८ रोजी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना बहुमतासाठी २ डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. आज झालेल्या बहुमत ठरावासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील सभागृहाचे कामकाज सांभाळले. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने १६९ आमदारांनी पाठींबा दर्शवत सहमती दर्शवली. मनसे, एएमआयएम, माकप सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतली.

काँग्रेसचे सदस्य अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरे सरकारवरील विश्वासाचा प्रस्ताव मांडला. त्याला सत्ताधारी बाकावरील आमदार नवाब मलिक, जयंत पाटील व सुनील प्रभू यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर आवाजी मतदान घेऊन शिरगणतीद्वारे मतदान घेण्यात आले. मतदान सुरू होताच भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर अध्यक्षांच्या सूचनेनुसार सभागृहाचे दरवाजे बंद करून गणती करण्यात आली.

बहुमत ठरावाच्या वेळी कॉंग्रेसचे जेष्ठनेते मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. कामकाजादरम्यान भाजपाच्या आमदारांनी विधानभवनात जोरदार घोषणाबाजी करत, ‘नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नाही चलेगी’ अशा घोषणा केल्या. सभागृह सुरू होताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमांना धरून अधिवेशनाबद्दल काही आक्षेप घेतले. अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रगीतानं का झाली नाही?, अधिवेशन बोलावण्यासाठी राज्यपालांचं समन्स आहे का?, असे प्रश्न उपस्थित केले. हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी फडणवीसांचे हे आक्षेप फेटाळून लावले. हे अधिवेशन नियमाला धरून आणि कायदेशीरच आहे, असं वळसे-पाटील स्पष्ट केलं.