उन्नाव बलात्कार प्रकरण: माजी आमदार कुलदीप सेंगर दोषी

0

मुंबई: उन्नाव बलात्कार आणि पीडिताच्या वडिलांच्या हत्येबाबतच्या निर्णयावर आज बुधवारी दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात सुनावणी झाली. याप्रकरणी भाजपचे निलंबित माजी आमदार कुलदीप सेंगर यांस सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरविण्यात आले आहे. मात्र, पीडितेच्या वडिलांना ठार करण्याचा हेतू आरोपीचा नव्हता, जमावाने केलेल्या अमानुष मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर हाच दोषी असल्याचा निर्णय कोर्टाने दिला. ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली ती अत्यंत अमानुष होती, असे निरीक्षण नोंदवत दिल्लीतील तीस हजारी कोर्टाने कुलदीप सिंह सेंगरला दोषी ठरवलं. या प्रकरणात माजी आमदार कुलदीप सिंह सेंगरसोबत 11 आरोपी होते. त्यापैकी 4 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर इतर 7 जणांना कोर्टाने दोषी ठरवलं. याप्रकरणी 12 मार्च रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. न्यायालयाने कलम 304 आणि कलम 120 ब अंतर्गत कुलदीपसिंह सेंगरला दोषी ठरवण्यात आले.

भाजपाचा निलंबित आमदार कुलदीप सेंगर याने उन्नाव येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना 2017 साली घडली होती. याप्रकरणी 4 मार्चला न्यायालयात सुनावणी होती. तत्पूर्वी उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांवर उपचार करणार्‍या डॉक्टर प्रशांत उपाध्याय यांचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. डॉ प्रशांत उपाध्याय हे ते डॉक्टर आहेत, ज्यांनी उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या वडिलांवर उपचार केले होते.