उन्हाचा तडाखा मारणार कोरोना व्हायरस !

0

नवी दिल्ली- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यावर लस शोधण्याचे काम सुरु असताना शास्त्रज्ञांना एक आशेचा किरण सापडला आहे. शास्त्रज्ञांच्या नव्या संशोधनानुसार, उन्हाळा वाढला तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार आहे. एरव्ही एप्रिल व मे हिट नकोशी वाटते मात्र आता नाइलाजाने का होईना सर्वजण एप्रिल हिटची आतूरतेने वाट बघू लागले आहेत.
जगातल्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटी आणि संस्थांनी केलेल्या अभ्यासानुसार, भारतात तापमानाचा पारा खाली असला तरी लवकरच उन्हाच्या झळा बसायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे कोरोनापासून मुक्तता मिळण्याचा आशा वाढल्या आहेत. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच एमआयटी ही आशा व्यक्त केली आहे. या संस्थेच्या नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार जर हवामान उष्मा आणि आर्द्रतेने भरलेले असेल तर कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता खूप कमी होईल. ज्या देशात तापमान ३ ते १७ अंश सेल्सिअस दरम्यान आहे आणि आर्द्रता प्रति घनमीटर ४ ते ९ ग्रॅम आहे, तेथे कोरोना विषाणूचे ९० टक्के रुग्णे आढळले आहेत. ज्या देशांमध्ये पारा १८ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त होता आणि आर्द्रता प्रति घनमीटरपेक्षा ९ ग्रॅमपेक्षा जास्त होती, तिकडे ६ टक्केच रुग्ण आढळले आहेत. एमआयटीचा हा अहवाल दिलासा देणारा आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या काही दिवसांत भारतातील तापमानात वाढ होणार आहे. अमेरिकेतच अभ्यासाअंती उष्ण आणि थंड भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगवेगळा असल्याचं नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेच्या उत्तरी राज्यांत, थंडी अधिक आहे, तिथे कोरोनाचे जास्त रुग्ण आढळले आहेत. दक्षिणेकडील राज्य थोडी उष्ण असल्याने उत्तरी राज्यांच्या तुलनेत इथे कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. या संशोधनात असेही म्हटले आहे, की भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया आणि आफ्रिकन देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव उबदार हवामानामुळे खाली आला आहे.