उर्मिला मातोंडकर कॉंग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात?

0

मुंबई-लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात सिनेजगतातील कलाकारांना उतरवून त्याचा राजकीय फायदा करून घेण्याचा सर्वच पक्ष प्रयत्न करीत आहे. दरम्यान कॉंग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना राजकारणात उतरविण्याची तयारू सुरु केली असून त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांना उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची निमंत्रण काँग्रेसकडून देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. उर्मिलाने मात्र याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली असल्याने उर्मिला मातोंडकर त्यांच्या विरोधात निवडणूक लढू शकतात. याच मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अभिनेत्री आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदेही इच्छूक असून त्यांच्या मागणीवर पक्षाने कोणताही निर्णय दिलेला नाही.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम हे २०१४च्या लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांच्याविरुद्ध लढले होते. त्यावेळी शेट्टी यांनी मोठ्या मताधिक्क्याने निरुपम यांचा पराभव केला होता. ही बाब ध्यानात घेऊन निरुपम यांनी त्यांचा दांडगा जनसंपर्क असलेल्या मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून पक्षाकडे तिकीट मागितलं असून त्यांना त्यासाठी होकार मिळाल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

२००४ मध्ये उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेसने अभिनेता गोविंदा यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसचा हा पत्ता चालला आणि गोविंदा यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव केला. काँग्रेसला यावेळी २००४ ची पुनरावृत्ती करायची असून त्यासाठीच उर्मिला मातोंडकर हा ग्लॅमरस चेहरा या मतदारसंघात उतरवण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.