एकीकडे लग्नाची तयारी सुरु अन् चोरट्यांनी नवरदेवाचेच घर फोडले

0

वावदडा येथील घटना : 45 हजाराची रोकड, दुचाकी लांबविली

जळगाव : लग्न लावण्याची तयारी सुरु असतांनाच चोरट्यांनी नवरदेवाच्या घर फोडून 45 हजार रुपयांची रोकड व लग्नाला आलेल्या पाहुण्याची दुचाकी लांबविल्याची घटना गुरुवारी दुपारी पावणे दोन वाजता वावडदा, ता.जळगाव येथे घडली. दरम्यान 45 हजार लग्नात बँड वाल्याला देण्यासाठी घरात ठेवले असल्याची माहिती मिळाली आहे.

वावडदा येथील शेतकरी लक्ष्मण बाबुराव मराठे (50)यांचा मुलगा मुकेश याचा बुधवारी विवाह सोहळा होता. घरापासून अगदी शंभर मीटर अंतरावर जिल्हा परिषदेच्या शाळेत दुपारी लग्न लागले. त्यामुळे घराला कुलुप लावून सर्वच कुटुंब व नातेवाईक लग्नस्थळी होते. घराकडे कोणीच नव्हते. लग्न लागल्यानंतर बॅँडवाल्यांचे पैसे द्यायचे असल्याने लक्ष्मण मराठे घरी आले असता काचेचे कपाट फोडलेले होते तर त्यात ठेवलेले 45 हजार रुपये गायब झालेले होते.

शेजारच्या भावाच्या घरातही प्रयत्न
लक्ष्मण मराठे यांच्या शेजारीच त्यांचे भाऊ रतन मराठे वास्तव्याला आहेत. नवरदेवाच्या घरात चोरी झाल्याची चर्चा होताच नातेवाईक घरी धावले असता शेजारी राहणार्‍या रतन यांच्या घरातही चोरट्यांनी डबे व इतर साहित्याची नासधूस केलेली होती, मात्र त्यांच्या घरात रोकड किंवा दागिने नसल्याने चोरटे रिकाम्या हाताने परतले. परत जातांना लक्ष्मण मराठे यांच्या घराबाहेर लावलेले राजधर श्रीपत पाटील (50, रा.पळासखेडा, ता.भडगाव) यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.19 बी.ए.2586) लांबविण्यात आल्याचे उघड झाले. पाटील हे लग्नासाठीच आले होते. दरम्यान, चोरीचा प्रकार उघड झाल्यानंतर लक्ष्मण मराठे व सामाजिक कार्यकर्ते रवी कापडणे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.