एजंट ते वाहन निरिक्षकापर्यंतच्या साखळीव्दारे सूक्ष्म नियोजनातून महिन्याला लाखोंची वसुली

0

ओव्हरलोड वाहनमालकांकडून हप्तेखोरीसाठी जिल्हाभरात 50 पेक्षा अधिक जणांचा वापर

जळगाव – भार क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणार्‍या वाहनांवर कारवाई न करता, ही कारवाई टाळण्यासाठी संबंधित वाहनमालकांकडून दर महिन्याला वाहनाच्या प्रकारनुसार हप्ते वसूल केले जात आहे. ओव्हरलोड माल वाहून नेणार्‍या मालकांकडून हप्ते वसुलीसाठी जिल्हाभरात 50 पेक्षा अधिक खाजगी व्यक्तींचा वापर होत असून एजंट ते मोटार वाहन निरिक्षकापर्यंतच्या साखळीव्दारे अंत्यत सूक्ष्म नियोजनातून संबधित वाहनमालकांकडून महिन्याला बिनधास्तपणे अनेक वर्षापासून लाखो रुपयांची वसुली केली जात असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे अधिकारी बदलला, काळ बदलला मात्र अनेक वर्षापासूनच्या आहे त्याच साखळीव्दारे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ओव्हरलोड वाहनांव्दारे होणारी हप्तेखोरी मात्र कायम असल्याचे चित्र आहे.

1 एजंट करतो 500 पेक्षा अधिक वाहनमालकांडून वसुली

हप्तेखोरीसाठी काम करणार्‍या एका एजंटकडे 500 पेक्षा अधिक ओव्हलोड धावणार्‍या वाहनांच्या मालकांकडून वसुलीची जबाबदारी असते. अशाप्रकारे 50 एजंटचा विचार केल्यास ही वाहनमालकांची आकडेवारी हजारोंच्या घरात आहे. अशाप्रकारे आपआपल्याकडील वाहनांच्या यादीनुसार संबंधित मालकांकडून काम करणारा एजंट ठरल्यानुसार रक्कम वसूल करतो. संंपूर्ण 50 जणांची एकूण रक्कम संबंधित मोटार वाहन निरिक्षकाचा खाजगी व्यक्तीकडे जमा होते. या खाजगी व्यक्तीला ‘एडीसी’ असे म्हटले जात असल्याची चर्चा आहे. सर्वाची जमा झालेली एकूण रक्कम एडीसी वायु वेग पथकात नेमणुकीस असलेल्या मोटार वाहन निरिक्षकाकडे जमा करतो. मोटार वाहन निरिक्षक यातील काही रक्कम दर महिन्याला विविध जणांना वाटप करण्यासाठी खर्च करतो आणि उर्वरीत सर्व रक्कम उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍याकडे जमा करत असल्याची चर्चा आहे.

अल्पावधीच ‘एडीसी’ म्हणून काम करणारा लखपती

दर महिन्याला 1 ते 10 तारखेदरम्यान सर्व 50 एजंटला आपआपल्याकडील जिल्ह्यातून धावणार्‍या ओव्हलोड वाहनांच्या क्रमांकाची यादी ‘एडीसी’ (मोटार वाहन निरिक्षकाचा खाजगी व्यक्ती) सादर करावयाची असते. ही यादी एडीसी मोटार वाहन निरिक्षकाकडे सादर करतो. गेल्या काही वर्षाचा विचार केल्यास एडीसी म्हणून काम करणार्‍या मोटार वाहन निरिक्षकाचा खाजगी व्यक्ती काही दिवसातच लखपती बनल्याची चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी गणपती स्टिकरचा होत होता वापर

हप्तखोरीसाठी देवाचा वापर करण्यातही उपप्रादेशिक परिवहन विभागाने कुठलीच कसर ठेवलेली नाही. काही दिवसांपूर्वी धावणार्‍या ओव्हरलोड वाहनांची संख्या कमी होती. त्यामुळे संबंधित वाहनामालकाकडून ठरलेली रक्कम जमा झाल्यानंतर त्याला गणपतीचे स्टिकर दिले जात होते. गणपतीच्या स्टीकर हे रस्त्यावर कारवाई करणार्‍या पथकासाठी कोडवर्ड होते. कारवाईदरम्यान ज्या वाहनचालकाकडे गणपतीचे स्टिकर दिसले त्याचे वाहन सोडले जात होते. मात्र आता वाहनांची संख्या वाढल्याने ही पध्दत हद्दपार झाल्याची चर्चा आहे.