एटीएम सेवा सुरळीत करा, अन्यथा आंदोलन

0

भुसावळात जनरल कामगार संघटनेचे प्रशासनाला निवेदन

भुसावळ- शहरात 25 पेक्षा जास्त एटीएम असले तरी बहुतांश पैशांअभावी बंद असतात. यामुळे ग्राहकांची होणारी गैरसोय थांबवून एटीएम सेवा सुरळीत करावी, अन्यथा उत्तर महाराष्ट्र जनरल कामगार संघटना आंदोलन छेडेल, असा इशारा प्रांताधिकार्‍यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदनाचा आशय असा की, भुसावळात रेल्वे, आयुध निर्माणी, दीपनगर कर्मचार्‍यांचा रहिवास आहे. या प्रत्येकाचा बँकांशी दैनंदिन संबंध येतो. प्रामुख्याने दर महिन्याच्या एक तारखेपासून कर्मचार्‍यांचे वेतन बँकांमध्ये जमा होते. यामुळे 1 ते 10 तारखेपर्यंत पैसे काढण्यासाठी अनेक जण एटीएमवर जातात. मात्र, एटीएममध्ये पैशांचा ठणठणाट असल्याने ग्राहकांना पैसे काढण्यासाठी तासनतास बँकेत उभे राहावे लागते. ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्तांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. किमान हा त्रास टाळण्यासाठी बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करावी, अशी मागणी संघटनेने केली. जळगाव जिल्ह्याचे युवा नेते तथा काँग्रेस कमेटीचे प्रदेश सदस्य योगेंद्र पाटील, उत्तर महाराष्ट्र जनरल कामगार संघटना अध्यक्ष प्रवीणसिंग पाटील, नितीन पटाव, सुनील न्हावकर, अशोक राठोड, सुधाकर पाटील, लक्ष्मण कोल्हे, अशोक ढाके, रमेश चौधरी, बळीराम फिरके आदींची उपस्थिती होती.

अशा आहे मागण्या
शहरातील एटीएम सेवा सुरळीत करणे, शहरातील 80 टक्के बँकांचे प्रिंटर मशीन बंद असल्याने खातेदारांचे पासबुक भरून मिळत नाही. मिळाले तरी ते दोन ते तीन महिन्यातून एक वेळेस भरून देतात. त्यामुळे नेमके किती पैसे कापले गेले? याची माहिती नागरिकांना कळत नाही, या समस्या सोडवण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली.