Sunday , March 18 2018

एप्रिलपासून केंद्रीय कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग!

गूड न्यूज : किमान बेसिक 21 हजार रुपये होणार
केंद्र सरकारकडून लवकरच घोषणा शक्य : सूत्र

पुणे : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच केंद्रीय कर्मचार्‍यांना पगारवाढीची गूड न्यूज देणार आहे. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत लहान संवर्गातील कर्मचार्‍यांना पगारवाढ देण्याची एप्रिल 2018 ची मुदत नजीक आली असून, एप्रिलपासून सातवा वेतन आयोगानुसार पगारवाढ मिळणार असल्याची माहिती वित्त विभागातील सूत्राने दिली आहे. वेतन आयोगातील मागण्यांची पूर्तता करण्यासाठी वित्त विभागात जोरदार हालचाली सुरु असून, कर्मचार्‍यांच्या पगारात किमान सात ते 18 हजार रुपयांची वाढ होणार आहे. म्हणजेच, किमान बेसिक वेतन हे 21 हजार रुपये होणार आहे. मोदी सरकार लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करणार असून, येत्या एप्रिल महिन्यापासून वाढीव पगार कर्मचार्‍यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहितीही वित्त विभागातील वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली आहे.

किमान वेतन 18 ते 21 हजार होणार
सूत्राच्या माहितीनुसार, पे मेट्रिक 1-5 पर्यंतच्या कर्मचार्‍यांचा किमान पगार वाढणार असून, किमान पगार 26 हजार रुपये करण्याची मागणी केंद्रीय कर्मचारी वारंवार करत होते. या मागण्यांची वेतन आयोगाने दखल घेतली असून, किमान बेसिक पे 21 हजार रुपये केलेला आहे. तसेच, लहान संवर्गातील कर्मचार्‍यांच्या पगार गणनेत फिटमॅट फॅक्टरला 2.57 पटीऐवजी आता 3.00 पट इतके करण्यात आले आहे. सातव्या वेतन आयोगात किमान वेतन हे 7 हजार रुपयांवरून 18 हजार रुपये इतके करण्यात आलेले आहे. तर कमाल वेतन हे 90 हजार रुपयांवरून अडिच लाख रुपये इतके करण्यात आलेले आहे. हा फिटमॅट फॅक्टर 2.57 इतका आहे. आगामी लोकसभा व काही राज्यांतील विधानसभा निवडणुका पाहाता, केंद्रीय कर्मचारीवर्गास खूश करण्यासाठी एप्रिलच्या पगारात नवीन वेतनवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, त्याबाबतची घोषणा लवकरच होईल, असेही सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा

आकर्षक शोभायात्रांनी गुढीपाडवा सजला

ढोलताशांचा दणदणाट, लेझीमचं शिस्तबद्ध संचलन, पारंपारिक पोशाखात नटलेल्या मंडळींचा सहभाग घराघरांवर उभारल्या गुढ्या : वाहनांपासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *