एमआयडीसीचे पाणी पिणार्‍या नागरिकांवर कपातीचे संकट

0 4

महापालिकेकडून एमआयडीसीच्या पत्राकडे दुर्लक्ष

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील काही भागातील नागरिकांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) पाणी पुरवठा केला जातो. मात्र, एमआयडीला पाणी टंचाई जाणवत असल्याने त्यांनी कपातीचे धोरण आखण्याची तयारी सुरू केली आहे. तसे एमआयडीसीने महापालिकेला कळविले असताना महापालिकेने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. एमआयडीसकडून महापालिकेच्या हद्दीतील भागाला विविध व्यासाच्या 12 नलिका जोड दिल्या आहेत. त्याद्वारे दररोज 30 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. निगडी गावठाण, केएसबी चौक, बजाज ऑटो, मोरवाडी, भोसरी, गवळी माथा, लांडेवाडी आदी भागाचा त्यात समावेश आहे. दररोज सुमारे 10 हजार नागरिक एमआयडीसीने पुरविलेले पाणी पितात. त्यात गेली कित्येक दिवसांपासून एमआयडीने कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

या बाबतीत एमआयडीसी आणि पालिका यांच्यात 8 नोव्हेंबर 2017 रोजी पत्रव्यवहार झाल्याचे पुढे आले आहे. पिंपरी-चिंचवड एमआयडीसीसह चाकण एमआयडीसीतही पाण्याची मागणी वाढली आहे. त्यानुसार पालिकेने मैला शुध्दीकरण केंद्रात शुध्द केलेले पाणी बगीचे, उद्यान, रोप वाटिका, बांधकाम आदींना वापरल्यास पिण्याचे पाणी बचत होईल, असे पालिकेला एमआयडीसीने पत्राव्दारे सूचित केले होते. मात्र, पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. पालिकेने एमआयडीसीला काहीही उत्तर दिलेले नाही. त्यामुळे पाणी पुरवठ्यात काटकसर किंवा नाईलाजाने कपात करावी लागणार असल्याचे एमआयडीसीने म्हटले आहे. मात्र, पालिकेने त्यावर कसलीच भूमिका न घेतल्यामुळे एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.

कित्येक दिवस विस्कळीत पुरवठा
या संदर्भात मनचे गटनेते सचिन चिखले म्हणाले की, निगडी परसिरातील सुमारे 2 हजार घरांना एमआयडीसीचा पाणी पुरवठा होतो. गेली कित्येक दिवस विस्कळीत पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक संकटात आहेत. एमआयडीसीकडे विचारणा केली असता 8 नोव्हेंबर 2017 चे पत्र दाखविले जाते. त्याला पालिकेने कसलेच प्रत्युत्तर दिले नसल्यामुळे पाणी कपात केली जात असल्याची भीती नागरिकांच्या मनात आहे.