एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युएटीमध्ये १० लाख रूपयापर्यंतची वाढ

0
मुंबई – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युएटीमध्ये १० लाख रूपयापर्यंतची वाढ करण्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. त्यामुळे एमआयडीसीचा नावलौकिक वाढवण्यासाठी येत्या काळात सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, उद्योगस्नेही धोरण अवलंबून महाराष्ट्राला प्रगतीपथावर अग्रस्थानी ठेवावे, असे मत सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा ५६ वा वर्धापन दिन  पार पडला. या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उद्योगमंत्री देसाई बोलत होते. महामंडळ कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटीमध्ये वाढ करून दहा लाखांपर्यंत ग्रॅच्युटी देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.  या कार्यक्रमात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आतापर्यंतच्या वाटचालीवर प्रकाश टाकण्यात आला. मॅग्नेटिक महाराष्ट्रामुळे राज्यात गुंतवणूक वाढली असून राज्याच्या प्रगतीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याच्या सूचनाही या वेळी उद्योगमंत्र्याकडून करण्यात आल्या. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या विभागाचा नावलौकिक वाढवण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करावेत, उद्योगस्नेही धोरण अवलंबून महाराष्ट्राला प्रगतीपथावर कायम अग्रस्थानी ठेवावे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
यावेळी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ, सहमुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कृष्णा, कैलास जाधव, एमआयडीसी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल पेडणेकर, एमआयडीसी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष डी. बी. माळी हेमंत संखे आदी उपस्थित होते. यावेळी एमआयसीमधील कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.